अदानी-एनडीटीव्ही

 

 

अदानी उद्योग समूहाला प्रत्येक क्षेत्रात आपले पाय रोवायचे आहेत. हा सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असून, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूहही अनेक क्षेत्रांत सक्रिय आहे. या दोन्ही उद्योग समूहांना केंद्र सरकारकडून मदत केली जात असल्याचा विरोधकांचा आरोप नवा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानी आणि अंबानी यांना वारेमाप सवलती देत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जाते. मुकेश अंबानी यांनी एका माध्यमावर ताबा मिळविल्यानंतर गौतम अदानी यांनीही एका माध्यमावर ताबा मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मागच्या दाराने किंवा अप्रत्यक्षरित्या अदानी उद्योग समूहाने एनडीटीव्हीवर ताबा मिळविण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींना जवळपास यश आल्यात जमा आहे. न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड कंपनी म्हणजेच एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीची स्थापना करणाऱ्या ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ या कंपनीच्या संचालकपदाचा प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याने अदानी उद्योग समूहाचा माध्यम क्षेत्रात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी यांचाही माध्यम क्षेत्रात प्रवेश झाल्यात जमा आहे. सरकारच्या कामगिरीचे विश्लेषण करुन सडेतोड मत मांडणारी एनडीटीव्ही ही वृत्तवाहिनी नेहमीच चर्चेत असते. या वाहिनीवरुनच रवीश कुमार नावाचे पत्रकार मोदी आणि मोदी सरकारवर टीका करत असतात. त्यांना तसा प्रतिसादही मिळतो. या वाहिनीवर प्रणव आणि राधिका रॉय दाम्पत्याचा हक्कच संपुष्टात आल्याने रवीश कुमार यांनाही मागेपुढे एनडीटीव्हीत स्थान मिळणार नाही, निश्चित झाले आहे. माध्यम आता मिशन राहिले नसून, माध्यमांना व्यवसाय आणि धंद्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कंपनी म्हणून व्यवसाय करताना सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ‘वॉचडॉग’ची भूमिका एनडीटीव्ही ही वृत्तवाहिनी बजावत आली आहे. तिच्यावरील मालकी बदलल्यानंतर भूमिकाही बदलणार आहे. एनडीटीव्हीवर अदानी उद्योग समूह मिळविणार, असल्याचे ऑगस्ट महिन्यात उघड झाल्यानंतर रवीश कुमार राजीनामा यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा होती. मात्र, ही अफवा असल्याचा खुलासा त्यांनीच केला होता. प्रणव आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा एनडीटीव्हीवरील हक्क संपुष्टात आला आहे. अदानी उद्योग समूहाचा एनडीटीव्हीचा अद्याप पूर्ण हक्क मिळालेला नाही. मात्र, तो लवकरच मिळेल, असे स्पष्ट संकेत असल्याने रवीश कुमार यांना आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे. केंद्र सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका करणाऱ्या रवीश कुमार या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय करणार? हा एक प्रश्न आहे.

कर्जाच्या जाळ्यात रॉय

माध्यमांचा व्यवसाय कंपन्यांसारखा झाला आहे. कंपनी म्हटले की, प्रवर्तक आलेच आणि कंपनी चालविण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. प्रणव आणि राधिका रॉय हेही कर्जाच्या जाळ्यात अडकल्याने त्यांच्या हातातून एनडीटीव्ही निसटली. हे कर्ज प्रकरण बरेच गुंतागुंतीचे आहे. रॉय दाम्पत्याने आरआरपीआर (राधिका रॉय, प्रणव रॉय) ही एक खासगी कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत त्यांनी न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड म्हणजेच एनडीटीव्ही कंपनी स्थापन करुन वृत्तवाहिनी सुरू केली. थोडक्यात एनडीटीव्हीची प्रवर्तक म्हणजे संस्थापक कंपनी म्हणजे रॉय यांची आरआरपीआर कंपनी. या कंपनीने इंडियाबुल्सकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी आरआरपीआरने आयसीआयसीआयकडून कर्ज घेतले. आयसीआयसीआयकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी रॉय यांच्या कंपनीने पुन्हा विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (व्हीसीपीएल) या कंपनीकडून ४०३ कोटी ८५ लाख रुपये इतके बिनव्याजी कर्ज घेतले. कर्जाच्या करारानुसार व्हीसीपीएल कंपनीला वॉरंट्स देण्यात आले होते. कर्जकाळात किंवा त्यांनतर कधीही वॉरंट्सचे रूपांतर समभागांमध्ये करून ‘आरआरपीआर’चा ९९.९९ टक्के हिस्सा खरेदी व्हीसीपीएल करू शकेल, असा करार होता. याशिवाय ‘आरआरपीआर’च्या प्रवर्तकांकडून म्हणजे रॉय यांच्याकडील सर्व समभाग बाजारभावानुसार खरेदी करण्याचा अधिकारही ‘व्हीसीपीएल’ला मिळाला होता. या करारमदाराच्या वेळी अदानी उद्योग समूह कोठेही नव्हता. व्हीसीपीएलने वॉरंट्सचे रुपांतर समभागात केल्याने आरआरपीआर या कंपनीचे प्रवर्तक असलेल्या रॉय दाम्पत्याचा हिस्सा संपुष्टात आला आणि या कंपनीत व्हीसीपीएलची ९९.५० टक्के हिस्सेदारी आली. यामुळे एनडीटीव्हीत आरआरपीआरची सुमारे २९. ५० टक्के हिस्सेदारी यामुळे व्हीसीपीएलकडे आली. ती अदानी समूहाने विकत घेतल्याने त्यांचा एनडीटीव्हीत प्रवेश झाला. थोडक्यात मागच्या दाराने अदानी उद्योग समूह एनडीटीव्हीत आला आहे.

 

धोरण बदलेल

 

एनडीटीव्हीच्या व्यवस्थापनावर ताबा मिळविण्यासाठी अदानी समूहाकडे ५१ टक्के समभाग आवश्यक आहेत. ही पूर्तता करण्यासाठी या समूहाने खुल्या बाजारातून समभाग खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. त्यासाठी एका समभागाची किंमत २९४ रुपये इतकी निश्चित करण्यात आली असली, तरी शेअर बाजारात हा समभाग ४०० रुपयांच्या जवळपास आहे. ऑगस्टमध्ये अदानींचे नाव आल्यानंतर एनडीटीव्हीचा समभागाने उसळी घेतली. खुल्या ऑफरची मदत ५ डिसेंबर रोजी संपत आहे. ही मदत संपल्यानंतर किती टक्के समभाग अदानींनी खरेदी केले, हे कळेल. ते जर २६ टक्क्यांपेक्षा कमी भरले, तर संस्थापक गुंतवणूकदारांकडूनही समभाग खरेदी करुन एनडीटीव्हीवर ताबा मिळविण्याची तयारी केली जाऊ शकते. आरआरपीआर ही कंपनी प्रणव व राधिका यांची राहिलेली नाही. ती कंपनी व्हीसीपीएलची झाली आहे आणि व्हीसीपीएल’कडून अदानीने समभाग विकत घेतल्याने आरआरपीआरचे प्रवर्तक आणि एनडीटीव्हीचे प्रवर्तक आता मालक राहिलेले नाहीत. त्यामु़ळे रॉय यांना राजीनामा देण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. एका माध्यमाची मालकी दुसर्‍या मोठ्या उद्योगपतीकडे मागच्या दाराने गेल्यात जमा आहे. मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी यांचाही माध्यम क्षेत्रात प्रवेश झाल्यात जमा आहे. सरकारच्या कामगिरीचे विश्लेषण करुन सडेतोड मत मांडणारी एनडीटीव्ही ही वृत्तवाहिनी चर्चेत होती. भविष्यात एनडीटीव्हीच्या धोरणात बदल होईल. व्यवस्थापन बदलेल आणि कर्मचारीही बदलले जाण्याची शक्यता आहे.

सरकारवर टीका करणारी, चिकित्सा करणारी ही वाहिनी नवे स्वरुप घेऊन नव्या भूमिकेत दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *