वेरूळे गावातील घटना, आरोपी जेरबंद
अभोणा । वार्ताहर
कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाणे हद्दीतील
वेरूळे गावात राहणाऱ्या नातवाने ‘खर्चायला पैसे देत नाहीत, भेदभाव करतात’ या शुल्लक कारणावरून वयोवृध्द आजी – आजोबांची कुर्हाडीचे घाव घालून निर्घून हत्या केली. पोलिसांनी जलद गतीने तपास यंत्रणा राबवून काही तासात संशयितास बेड्या ठोकून जेरबंद केले आहे.
वेरूळे गावाजवळून दूर शेतातील घरात राहणारे नारायण मोहन कोल्हे ( ९४ ), सकुबाई नारायण कोल्हे ( ८८ ) हे वयोवृध्द दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची खबर त्यांचा मुलगा अमरचंद नारायण कोल्हे ( ६६, रा. वेरूळे, हल्ली रा.अभोणा ) यांनी अभोणा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अभोणा ग्रामीण रूग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जलद तपास करण्यात आला. त्यात काळू उर्फ राजकुमार हरी कोल्हे ( रा.वरखेडा शिवार ता.कळवण ) या संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी मयत दाम्पत्याचा सख्खा नातु असल्याचे समोर आले आहे. या दुर्देंवी घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केला.