जात पंचायतीने केला अल्पवयीन गर्भवती वधूचा परस्पर घटस्फोट

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील मोलमजुरी करणार्‍या  कुटुंबातील  अल्पवयीन मुलीचा परस्पर घटस्फोट करण्याचा निर्णय जात पंचायतीने  केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या मुलीने बाळाला जन्म दिला असून,  जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार केले जात आहेत. या सर्व प्रकरणात जात पंचायतीसह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जात पंचायत मुठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
जात पंचायत मुठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील टाके देवगाव ( धारेचीवाडी) येथील 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह झाला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाणे (सपर्‍याची वाडी) येथील तरुणाशी तिची लग्नगाठ बांधण्यात आली. कोरोना काळ सुरू असतानाही या बालविवाह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोखला. तरीही हा विवाह झाला. सरकारी पातळीवर त्याची कुठलीही गांभिर्याने दखल घेण्यात आली नाही. एका रात्री मंदिरात हा विवाह करण्यात आला. अल्पवयीन वधू ही दोन महिने सासरी राहिली. त्यानंतर तिला माहेरी सोडून देण्यात आले. त्याचवेळी हे स्पष्ट झाले की, ही अल्पवयीन वधू गर्भवती आहे. वधूच्या कुटुंबियांनी ही बाब सासरकडच्यांना सांगितली. पण, त्यांनी वधूला परत सासरी आणण्यास नकार दिला.
दोन्ही कुटुंबियांची मध्यस्थी आणि मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले पण त्यात यश आले नाही. एवढ्या लवकर आपल्याला अपत्य नको, अशी भूमिका वरासह त्याच्या कुटुंबियांनी घेतली. तसेच, पाच आठवड्यांचा गर्भ असल्याने गर्भपातही अशक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आता यावर तोडगा काढण्यासाठी थेट जात पंचायतीकडे धाव घेण्यात आली. धक्कादायक म्हणजे, जात पंचायतीने वधूला न्याय देण्याऐवजी थेट वराच्या बाजूने निकाल दिला. आणि 100 रुपयांचे प्रतिज्ञापत्र केले. त्याचबरोबर वराला दुसरा विवाह करण्यास मान्यता दिली गेली. हे सर्व बेकायदेशीर असतानाही त्याबाबत फारशी वाच्यता झाली नाही. हे सर्व कमी म्हणून की काय, वधूने दर दुसरे लग्न केले तर वर पक्षाला 51 हजार रुपये भरपाई द्यावी, असे फर्मानही काढल  आहे.
जात पंचायतीचा जाच सुरूच
नाशिक जिल्ह्यात यापूर्वीही जात पंचायतीचे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. मात्र, तरीही जात पंचायतीच्या अनिष्ट प्रथा कमी झालेल्या नाहीत. आताही या प्रकरणात अल्पववयीन मुलीचा छळ झाल्याची बाब उघड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *