दोन हजाराची नोट 

दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदीची घोषणा केली होती. त्याच मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर पाचशेची नवीन नोट चलनात आली, तर एक हजाराच्या नोटेऐवजी दोन हजारांची नोट चलनात आली. सोबत दोनशे रुपयांचीही नोट आली. नोटबंदीमुळे काळा पैसा आणि दहशतवादाला चाप लागेल, असा दावा सरकारने केला होता. परंतु, तसे काही झाल्याचे दिसत नाही. दहशतवादाला चाप बसलेला नाही आणि काळा पैसाही बाहेर आला नाही. काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटेचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी संसदेत केला. ही नोट चलनातून बाद करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दोन हजारांची नोट म्हणजे थेट काळा पैसा! जोपर्यंत ही नोट चलनात आहे, तोपर्यंत  काळ्या पैशाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करता येणार नाही म्हणून ही नोट चलनातून ताबडतोब बंद करावी, अशी मागणी त्यांनी रिझर्व्ह बॅंकेकडे केली. या नोटेचे आता काही औचित्य नाही, असेही ते राज्यसभेत म्हणाले. नोटबंदी करण्यात आली तेव्हा एक हजार रुपयाच्या नोटेला पर्याय म्हणून दोन हजाराची नोट चलनात आणण्यात आली. या नोटेचे त्यावेळी स्वागतही झाले. परंतु, इतक्या मोठ्या रकमेची नोट छोट्या व्यवहारांसाठी उपयुक्त ठरत नव्हती. मोठ्या व्ववहारांत तिचा वापर होत राहिला. कालांतराने तोही कमी होत गेला. आता तर ही नोट चलनातूनही गायब झाली आहे. ती गेली कोेठे? हा एक प्रश्न असला, तरी जादा रकमेच्या नोटांमुळे काळा पैसा वाढतो. काळा पैसा हा जादा रकमेच्या नोटांमध्येच साठवला जातो, असा एक सर्वसाधारण निष्कर्ष आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या गेल्या होत्या. जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देण्यात आल्या. रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या जुन्या नोटांची संख्या चलनात असलेल्या नोटांच्या तुलनेत फार कमी नव्हती. याचा अर्थ, जितके चलन रद्द करण्यात आले तितकेच चलन जुन्या नोटांच्या स्वरुपात रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याने काळा पैसा बाहेर आला नाही. काळा पैसा वाचवून लोकांनी नोटा बरोबर बदलून घेतल्याने सरकारचा उद्देश सफल झाला नाही. काळा पैसा साठविण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर होत असल्याचा संशय आता बळावत चालला असल्याने सुशीलकुमार मोदी यांनी ही नोट चलनातून बाद करण्याची मागणी केली आहे. चलनात दोनशे रुपयांची नोट दिसत नसेल, तर रिझर्व्ह बँकेला या मागणीचा विचार मागेपुढे करावाच लागणार आहे.

काळा पैसा गेला कोठे?

हजार आणि पाचशेच्या जवळपास सगळ्याच जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत जमा झाल्याने देशात जो तथाकथित अब्जावधी रुपयांचा काळा पैसा होता तो नेमका कोठे गेला यावरही सुशीलकुमार मोदी यांनी भाष्य करुन सरकारला त्यावर उत्तर देण्यास भाग पाडले पाहिजे. सरकारने यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. देशातील काळ्या पैशाचा प्रश्न कायम आहे तसा विदेशातील काळ्या पैशाचा विषयही कायमच. विदेशातील बॅंकांमध्ये भारतीयांचा प्रचंड प्रमाणात काळा पैसा होता तो भारतात परत आणण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली होती. गेल्या आठ वर्षांत एक रुपयाचेही काळे धन विदेशातून आलेले नाही. सुशीलकुमार मोदींनी उपस्थित केल्यानंतर देशातील एकूणच चलनविषयक स्थितीवरही संसदेत चर्चा होणे गरजेचे आहे. तूर्त प्रश्न दोन हजार रुपयांच्या नोटेचा आहे. सामान्य माणसाला कमीतकमी त्रास होईल, असा विचार सरकारने करणे अपेक्षित असते. पण, सरकार किंवा रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणून अडचणच निर्माण केली. मोठ्या रकमेची ही नोट गरीब माणसाला नकोशी झाली. एक हजार  रुपयांची नोट लोकांच्या अंगवळणी पडली होती. तिचा वापर केला जात होता. तिची जागा दोन हजाराच्या नोटेने घेतल्याने व्यवहारात अडचणी यायला लागल्या. नोटबंदीनंतर चलन टंचाई होती. तोपर्यंत ही नोट वापरात होती. पण, चलनाची चणचण संपल्यानंतर अचानक ही नोट गायब झाली. दरम्यानच्या काळात दोन हजार रुपयांच्या नोटा होणार, अशा अफवा येत होत्या तेव्हा सरकारने इन्कार करुन नोटा बंद होणार नाही, असे खुलासे केले. या पार्श्‍वभूमीवर चलनात या नोटा कमीच दिसतात किंवा दिसतही नाहीत. मग, रिझर्व्ह बॅंकेने मोठ्या प्रमाणावर छापलेल्या या नोटांचे नेमके काय झाले? काळा पैसा या नोटांच्या माध्यमातून साठवला गेला आहे काय, अशीही शंका उपस्थित होते. सुशीलकुमार मोदींना तेच सुचवायचे आहे. त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे. दोन हजारांच्या नोटा व्यवहारातून काढून टाकून वाटल्यास पुन्हा एक हजाराच्या नोटा चलनात आणण्याच्या विचार करता येईल.

छपाई बंद

दोन हजार रुपयांच्या नोटा काळ्या पैशांच्या स्वरुपात दडविल्याने त्या दिसत नसल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. दुसरीकडे बँकांमध्ये लोकांनी ठेव म्हणून जमा केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा  पैसे काढणार्‍या लोकांना बँकांकडून परत केल्या जात नसतील, तर त्या दिसणार तरी कशा? दुसरीकडे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बॅंकेने बंदच केली आहे. त्यामु़ळे या रकमेच्या नवीन नोटा बाजारात येत नाहीत. सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांमध्ये २००० हजाराची एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती  समोर आली आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३५,४२९ कोटी मूल्याच्या २००० च्या नोटा छापल्या. २०१८-१९ या वर्षात २००० हजारांच्या केवळ ४६६.९० कोटी मूल्याच्या नोटा छापण्यात आल्या. त्यानंतर या नोटा छापण्यात आल्या नाहीत. या नोटांची अडचण सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आली असेल, ज्याअर्थी, नोटा छापणे बंद करण्यात आले, त्याअर्थी, या नोटा मागेपुढे चलनातून बाद करण्याचा सरकारचा विचार असू शकतो. याच रकमेच्या बनावट नोटाही चलनात आल्या आहेत. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकांना वेळोवेळी खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. बँकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना बनावट नोटा ओळखण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार रुपयांची नोट चर्चेत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *