नाशिक -पेठ बसला फुलेनगरजवळ आग

नाशिक : प्रतिनिधी
पळसे, मिरची चौक येथील बसला आग लागण्याच्या घटना ताज्या असतानाच आज दुपारी पेठहून नाशिकला येणार्‍या बसमधून अचानक धूर निघू लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला कळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
पेठहून येणारी एमएच 14 बी.टी 3338 ही बस आरटीओ कार्यालयाजवळ फुलेनगर थांब्याजवळ येताच इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करत प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. अग्निशामक दलाला कळविल्यानंतर बंब तातडीने दाखल होऊन आग भडकण्यापूर्वीच विझविण्यात यश मिळाले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरची चौक आणि पळसे गावाजवळ बसला आग लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही मोठी दुर्घटना घडता घडता वाचली. बसला वारंवार लागणार्‍या आगींमुळे महामंडळाच्या बसच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्सबाबत आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बसमधून धूर निघू लागताच प्रवाशांनी आरडा ओरड केला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *