‘वाईन सिटी”त वाईट नजारा: मद्यधुंद महिलेचा रस्त्यावर धिंगाणा!

“वाईन सिटी”त वाईट नजारा: मद्यधुंद महिलेचा रस्त्यावर धिंगाणा!

सिडको:  दिलीपराज सोनार
“मंत्रभूमी ते यंत्रभूमी” अशी ओळख असलेल्या नाशिकने गेल्या काही वर्षांत “ग्रेप सिटी” ते “वाईन सिटी” असा प्रवास अनुभवला आहे. परंतु, हीच वाईन सिटी आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. इंदिरानगर बोगद्याजवळ एका मद्यधुंद महिलेने सार्वजनिक रस्त्यावर चक्क वाहने अडवत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही महिला मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे स्पष्ट दिसून येत असून, तिने काही वाहनचालकांना अडवून त्रास दिला, तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. सदर प्रकारामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि काही काळासाठी नागरिकांचे हाल झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रीत करत सोशल मीडियावर अपलोड केला, आणि तेथूनच हे प्रकरण सर्वत्र पसरले.

नाशिक शहरात वाईन उत्पादन व सेवन सामान्य झाले असले तरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणं हे शहराच्या संस्कृतीशी सुसंगत नाही. विशेषतः महिलांनी सामाजिक जबाबदारी जपावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही अशा प्रकारांना आळा बसणं आवश्यक आहे.

पोलीस प्रशासनाने सदर महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी दर्शवली असून, यापुढे अशा घटनांना गांभीर्याने घेतले जाईल, असे सांगण्यात आले आहे. नाशिकसारख्या प्रगतिशील शहराची प्रतिमा खराब करणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासनाने आणि समाजानेही संवेदनशीलपणे पाहून योग्य तो पाऊल उचलणे गरजेचे आहे. “वाईन सिटी”ची ओळख केवळ वाईनपुरती मर्यादित न राहता, ती शिस्तबद्ध व जबाबदार नागरी जीवनशैलीची देखील असावी, हीच खरी काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *