मंत्री भुजबळांच्या आदेशाला मातीची टोपली

येवला महामार्गावर खड्ड्यांत माती, वाहनचालक त्रस्त

निफाड : विशेष प्रतिनिधी
पिंपळस ते येवला रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम प्रगतिपथावर असताना, या मार्गावर वाहतुकीची एक बाजू खुली ठेवून काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते की, वाहतुकीसाठी खुल्या ठेवलेल्या मार्गावर असलेले खड्डे तात्पुरते का होईना, पण बुजवण्यात यावेत. जेणेकरून प्रवाशांना, वाहनचालकांना त्रास होणार नाही. मात्र, ठेकेदाराने या आदेशाची अंमलबजावणी करताना खड्डे मातीने बुजविल्याने वाहनचालक, नागरिक अधिक त्रस्त झाले आहे.
खड्डे बुजवण्यासाठी डांबर-खडी किंवा योग्य साहित्याचा वापर न करता सरळ माती टाकून खड्डे बुजवले. परिणामी पावसाळ्यात ही माती निसटून चिखलात रूपांतरित होत आहे. रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अपघाताचा सामना करावा लागत आहे.
चिखल साचल्यामुळे रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त बाहेर पडणार्‍या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ आणि माती उडाल्याने अनेकांना डोळ्यांमध्ये आग होणे, खवखव, आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत आहेत.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना विशेषतः या असुरक्षित रस्त्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु अद्याप ठोस उपाययोजना केली नाही. ठेकेदाराची मनमानी व प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदारांवर योग्य कारवाई करून, खड्डे योग्य साहित्य वापरून बुजवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मंत्री भुजबळ यांनी पाहणी केल्यानंतर काहीसा दिलासा वाटला होता. मात्र कामाच्या दर्जाबाबत आणि तात्पुरत्या उपायांबाबत अजूनही गंभीर दुर्लक्ष होत आहे. माती टाकून खड्डे बुजवले जाणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
संजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते, निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *