नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांच्या दिवसाची सुरुवात दाट धुक्याच्या दुलईत होत आहे. पहाटेच्या वेळी शहरावर पांढरट धुक्याची चादर पसरलेली दिसत असून, दृश्य निसर्गचित्राप्रमाणे मोहक भासत आहे. मात्र, या धुक्यामुळे सकाळच्या वेळी वाहनचालकांना कमी दृश्यमानतेचा त्रास होत असल्याचेही चित्र दिसते. पहाटेच्या वेळी थंडी जाणवत असली तरी दुपारनंतर मात्र उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून मुसळधार पाऊस झाला. पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पावसाच्या सरी जिल्ह्यात कोसळल्या, त्यामुळे यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा प्रभाव जाणवला नाही. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर हवामान कोरडे होऊन थंडी जाणवायला
लागली आहे.
किमान तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी नाशिक शहरात किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके होते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात जवळपास 13 अंशांचा फरक असल्याने सकाळी व रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रासह नाशिक परिसरात येत्या काही दिवसांत हवामान कोरडे राहील. मात्र, सकाळच्या वेळात गारवा आणि धुक्याचा प्रभाव वाढेल. उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांमुळे तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिककर मात्र या थंडीचा आणि धुक्याचा आनंद घेताना दिसत आहेत. सकाळी धुक्यात फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी बाहेर पडणार्यांची संख्या वाढली आहे. शहरातील गंगाघाट, कॉलेज रोड, पंचवटी, सातपूर, गंगापूर रोड परिसर या ठिकाणी धुक्याचे अप्रतिम दृश्य दिसत आहे. नाशिककरांसह नाशिकला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठीही हा अनुभव अनोखा ठरत आहे.
दिवसाच्या वेळात ऊन पडत असल्याने वातावरण सुखद भासत असले तरी, सकाळ-संध्याकाळ थंडीमुळे लोक उबदार कपड्यांचा वापर करू लागले आहेत. नाशिकच्या हवामानात पडलेला हा हिवाळी गारवा आता शहरात खरी थंडी दाखल झाल्याचे संकेत देत आहे.