पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय वाटचाल करताना अजित पवार यांनी स्वत:ची एक वेगळी छाप पाडली. शिवाय स्वत:ची ओळखही निर्माण केली. ’दादा’ ही त्यांची खास ओळख. महाराष्ट्राच्या राजकारणात सांगलीचे वसंतदादा पाटील यांची 1977 ते 1988 पर्यंत दादा म्ह़णून ओळख होती. पुणे जिल्ह्यातील भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना आजही दादा म्हटले जाते. अजित पविरांनाही दादा म्हटले जायचे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात ते खर्‍या अर्थाने दादा ठरले. ‘एकच वादा, अजितदादा’ ही घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. ती घोषणा अजित पवारांनी सार्थ ठरविली. शरद पवार यांनी ज्याप्रमाणे कार्यकर्ते घडविले, त्याचप्रमाणे अजितदादा कार्यकर्ते घडवत होते. काँग्रेस आणि विभाजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाचे काम करण्यासाठी फ्री हँड दिला होता. काकांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविताना अजित पवार यांनी स्वतःभोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले आणि पक्ष वाढविला. कार्यकर्त्यांच्या भाषेत दादा बोलत असायचे. अरे इकडे ये, तिकडे जा, अरे थांंब ना बाबा, अशा प्रकारची भाषा ते जाहीर कार्यक्रमांतून ते सहजपणे बोलत असायचे. सडेतोड, रोखठोक बोलताना ते सहजपणे विनोद करायचे. आपल्या भाषेतूनच त्यांनी कार्यकर्त्यांची आपुलकी मिळविली, प्रेम मिळविले. जे शक्य असेल ते करण्यासाठी ते सतत पुढे राहिले. लोकांचा, समाजाचा विकास करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. केवळ बारामतीच्या नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा त्यांनी ध्यास घेतला होता. कामे करण्यासाठी त्यांनी कधीही वेळेचे बंधन पाळले नाही. त्यांचा दिवस अगदी पहाटे सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हेही त्यांना कळत नसायचे. मंत्रालयात तासन् तास ते काम करत बसायचे. शरद पवार यांच्याइतकीच त्यांच्या अंगी काम करण्याची मोठी क्षमता होती. उद्याच्या महाराष्ट्राचे एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. काम करण्याची उमेद असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. भाजपाचे महाराष्ट्रातील एक आश्वासक नेते गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून 2014 रोजी दिल्लीत अपघाती निधन झाले. तसे अजितदादा महाराष्ट्राला अचानक सोडून गेले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन 14 ऑगस्ट 2012 रोजी झाले. माजी उपमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री म्हणून कामाचा ठसा उमटवणारे आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांचे निधन 16 फेब्रुवारी 2015 ला झाले. काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली असताना राजस्थानातील आश्वासक नेते व उमदे नेते राजेश पायलट यांचे जयपूर येथे विमानतळाकडे जात असताना मोटार अपघातात 11 जून 2000 रोजी निधन झाले. काँग्रेसचे मध्य प्रदेशातील असेच एक आश्वासक व उमदे नेते माधवराव शिंदे यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर परदेशातील मैनपुरी येथे विमान अपघातात निधन झाले. मुंडे, पायलट, शिंदे यांचे अपघाती निधन त्यावेळी लोकांना चटका लावून जाणारे ठरले होते. अजितदादाही असेच चटका लावून गेले आहेत. नियतीच्या मनात काय असते याचा काही अंदाज लागत नाही. एखादा नेता अचानक निघून जातो तेव्हा एक पोकळी निर्माण होते. ती लवकर भरून निघत नाही. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आबा पाटील यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळीही भरून न येणारी आहे. पुढे काय होणार, याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. राजकीय जीवनात त्यांच्यावर काही आरोप झाले, तरी त्यांनी कामावर निष्ठा ठेवली. सकाळी सकाळी त्यांचे काम सुरू व्हायचे. काम व्हायलाच पाहिजे, याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यासाठी किती उशीर झाला, याचा विचार न करता ते मंत्रालयात बसून राहायचे. कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, हीच भावना कार्यकर्त्यांची होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचा उपयोग अजितदादांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी, नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी केला. शरद पवार यांच्याशी त्यांचे अलीकडे मतभेद झाले होते. पण अजितदादांनी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपल्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले. शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू अनंतराव पवार यांचे ज्येष्ठ पुत्र अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर (आता अहिल्यानगर) जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये त्यांचे वडील अनंतराव कामाला होते. आपले काका शरद पवार यांच्या मार्गानेच अजित पवार यांनी राजकारणात उतरण्याचे ठरविले. शरद पवार यांच्याप्रमाणेच ते तरुण वयातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 1982 साली म्हणजे वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी एका सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली. सन 1991 साली ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. या पदावर ते 16 वर्षे राहिले. सन 1991 सालीच ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले. शरद पवार यांना केंद्रात जाण्यासाठी त्यांनी लोकसभेची जागा खाली करून दिली. यानंतर याच वर्षी ते महाराष्ट्र विधानसभेवर बारामतीतूनच विजयी झाले. राज्य मंत्रिमंडळात 1992-93 मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्यांना ऊर्जा व कृषी ही खाती मिळाली. सन 1995 ते 2014 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांत ते बारामतीतून सलग निवडून गेले. सन 2019 व 2024 च्या निवडणुकांतही त्यांनी बारामती राखली. त्यांनी कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, सिंचन, अर्थ इत्यादी खात्यांचा कारभार पाहिला. सन 2009 साली विधानसभा निवडणूक झाली तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उपमुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. नंतर 2010 मध्ये अजितदादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 49 आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला व स्वतः उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा शरद पवार यांनी शांत बसण्याची भूमिका घेतली. अजितदादांनी हे बरं केलं नाही, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. नंतर त्यांनी तीन दिवसांत माघार घेत परत शरद पवार यांना जाऊन मिळाले. त्यानंतर काँग्रेेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले, तेव्हा अजितदादा परत एकदा मुख्यमंत्री झाले. दोन वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून भाजपाशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपद मिळविले, तेव्हा दादांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली. पण त्यांनी आपल्या पक्षातील 40 आमदारांना बरोबर घेऊन शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दादा परत एकदा उपमुख्यमंत्री झाले. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. नंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. सन 2024 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुती सरकारचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी अर्थसंकल्प मांडताना ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निकाल निवडणूक आयोगाने दिला. मतभेद निर्माण झाल्यानंतरही शरद पवार व अजित पवार यांनी आपले कौटुंबिक नाते जपले. दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजितदादांनी शांत राहण्याची भूमिका घेतली होती. वेगवेगळ्या प्रसंगी शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार एकत्र येत होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. जिल्हा परिषद निवडणुकांतही एकत्र आलेले असताना प्रचारासाठी जाताना विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यसभेतून शरद पवार निवृत्त होणार आहेत. त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार म्हणजेच पवार परिवार एकत्र येणार, अशी चर्चा असताना अजितदादा सर्वांना चटका लावून गेले. त्यांचे जाणे म्हणजे पवार परिवाराला बसलेला एक मोठा आघात आहे.

A blow to the Pawar family

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *