सटाणा :प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील नामपुर येथील एका सातबारा उतार्यावर बनावट नोंद प्रकरणी अखेर सटाणा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून तहसील कार्यलयातील अभिलेख कक्षात सातबारा उतार्यावर बनावट नोंद करणारा अज्ञात व्यक्ती शोधून काढण्याचे सटाणा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सटाणा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अजय पवार यांनी या गंभीर प्रकरणाची फिर्याद दिली असून याच मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोरील फाशी आंदोलनाला यश आल्याचे बोलले जात आहे.
नामपुर येथील गट नंबर 91च्या सातबारा उतार्यावर बनावट नोंद प्रकरणी दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी तक्रारदारांनी प्रांताधिकारी बबन काकडे यांना प्रांत कार्यालयासमोर फाशी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी गंगाधरन डी आणि पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे देखील करण्यात आली असतांना सातबारा उतार्यावर बनावट नोंद करणारे कोण याबाबत उलटसुलट चर्चा असतांना याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल होत नव्हता. अखेर या प्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 420,464,465,468 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार मणिन्द्र सावंत,संजय पवार,तुषार पोतदार यांनी या गंभीर प्रकरणाचा सखोल अभ्यास करून नामपुर येथील गट नंबर ९१ च्या सातबारा उतार्यावर बनावट नोंद केल्याचे पुरावे प्रांत बबन काकडे,जिल्हाधिकारी गंगाधरन डी आणि पोलिस अधीक्षक शाहजी उमाप यांच्याकडे सादर केले होते. दरम्यान तहसिलदार जितेंद्र इंगळे यांनी २८ नोव्हेंबर रोजी बनावट नोंद रद्द केली असतांना तक्रारकर्त्यांनी बनावट नोंद टाकणे आणि काढणे हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचा आरोप केला होता