नाशिक : प्रतिनिधी
अगामी लोकसभा निवडणुकांची अचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना शिवसेना युवा नेते खा. डाॅ.श्रीकांत शिंदे उद्या दिनांक 12 रोजी नाशिक दौर्यावर येत आहे. या दौर्यात ते नाशिक जिल्हयातील पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत. पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हे देखील यावेळी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. त्याचप्रमाणे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौर्याला नाशिक जिल्हयातील पेठ तालुक्यातील काहांडोळपाडा येथून सकाळी 10.30 वाजता सुरूवात होणार असून, मोहपाडा ते देवळाचा पाडा रस्त्यावर दमणगंगा नदीवरील पूलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता सुरगाणा नगर पंचायत येथे आठ कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे सुरगाणा शहरासाठी रूग्णवाहिका, अग्निशमन दल वाहन, घनकचरा संकलनासाठी ट्रॅक्टर, इतर वाहने यांचे लोकार्पण सोहळा होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी 4.30 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे युवासेनेच्या पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वूभमिवर हा दौरा होत असल्याने नाशिक लोकसभेच्या जागेबाबत खा. श्रीकांत शिंदे हे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरून स्थानिक शिवसेना आणि भाजपा नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत नाशिकची जागा कोणाला असणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी प्रत्येकजण नाशिक लोकसभेवर दावा करत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक लोकसभा शिवसेनाच लढवणार असे ठामपणे सांगितले पण तरीही स्थानिक भाजप नेते जागेवर दावा करीत आहे. या पार्श्वभूमिवर खा. डाॅ.श्रीकांत शिंदे काही बोलणार का? हे पाहावे लागेल.