अस्वच्छता करणाऱ्यांना दणका
सात लाखांचा दंड वसुल
नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात 1 ऑगस्ट 2022 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान एकूण 507 केसेस मध्ये 7 लाख 50 पन्नास 400 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ हे ध्येय समोर ठेऊन महानगरपालिकेची कार्यवाही सुरु आहे.
शहरात स्वच्छता राखण्यासासाठी भाजी मार्केट, बाजारपेठ, शहरातील विविध चौक, फुटपाथ, गर्दीची ठिकाणे येथे मनपाची पथके लक्ष ठेऊन आहेत. अस्वच्छता करणा-यांकडून दंड वसुल केला जात आहे.
कोणत्या कारणांमुळे कारवाई ?
विलगीकरण न केलेला आणि वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपवल्याबद्दल (घरगुती आणि व्यावसायीक आस्थापना), एसडब्लूएम अधिनियमन 2016 चा भंग केल्याबाबत, नदी, नाले येथे अस्वच्छता करणारे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, रस्ते मार्गावर अस्वच्छता करणे, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर घाण होणे, पालापाचोळा, प्लास्टिक, रबर आणि सर्व प्रकारचा कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मैला टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, उघड्यावर लघुशंका करणे, जैविक कचरा (बायो मेडीकल वेस्ट) सार्वजनिक ठिकाणी टाकणे अशा कारणांमुळे मनपाकडून दंडात्मक कारवाई होत आहे.
रस्ता स्वछता ठेवण्यात अपयश
मनपाकडून गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक कारवाई रस्ते मार्गावर अस्वच्छता करणा-यांविरुद्ध झाली आहे. एकूण 197 केसेस असून 57 हजार 260 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याखालोखाल सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी एकूण 112 केसेस आहेत. त्यातून 3 लाख 97 हजार 360 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. नागरिकांनी, विक्रेत्यांनी आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. खराब भाजीपाला, कचरा रस्त्यावर टाकू नये, कच-याचे वर्गीकरण करावे अन्यथा मनपाकडून संबंधित नागरिक किंवा आस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं आवाहन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.