सिडको : वार्ताहर
सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकानजीक असलेल्या उंटवाडी रोड येथे रहाणा-याएका चार वर्षीय बालिकेचा एका दुकानात आईस्क्रीम खाण्यासाठी गेली असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे मुलीच्या कुटुंबास जबरदस्त धक्का बसला आहे.
याघटनेबाबत अंबड पोलिसांकडुन मिळालेली अधिकृत माहिती अशी की त्रिमूर्ती चौक सुखशांती बंगलो मातोश्री चौक जगताप नगर उंटवाडी रोड येथे विशाल कुलकर्णी हे आपल्या चार वर्षीय ग्रीष्मासह त्यांच्या घराजवळील असलेल्या एका दुकानात रात्री नऊच्या सुमारास गेले. तेथे ते आईस्क्रीम खाण्यासाठी गेले असता ग्रीष्माला फ्रिजच्या वायरचा शॉक लागून ती खाली बेशुद्ध पडली.यामुळे ग्रीष्माचे वडील विशाल हे घाबरले. त्यांनी तातडीनं तिला उचलून नेत औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितलं. त्यामुळे विशाल कुलकर्णी यांना मोठा धक्का बसला. ग्रीष्मा अवघी चार वर्षाची होती. तिच्या मृत्यूमुळे कुलकर्णी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. ग्रीष्माच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढिल तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चव्हाण करीत आहेत