उमेदवारांना मोठ्या समस्यांचा करावा लागेल सामना
राज्यभरात मागील दोन महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागल्याने अनेकांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकारी मंडळांचा कालावधी फेब्रुवारी 2022 मध्ये संपला आहे. कोरोना महामारी, इतर मागासवर्गीय आरक्षण, उच्च न्यायालयातील याचिका, अशा एक ना अनेक कारणांनी या निवडणुका लांबणीवर पडल्या. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अखेर या निवडणुका डिसेंबर व जानेवारीत पार पडणार असल्याचा अदांज वर्तवला जात आहे. 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असल्या, तरी काही प्रभागांत अपील असल्याने त्या निवडणुका मात्र 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषद व जानेवारीअखेरपर्यंत महानगरपालिका निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. पळसे जि. प. गटात मात्र इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी असल्याने अनेक मातब्बर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पळसे गटातील सर्वाधिक मोठे गाव असणार्या पळसे येथे इच्छुकांची संख्या जास्त दिसत असली, तरी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचा तंबू राहतो, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. मागील बारा-तेरा वर्षांच्या कालावधीत मतदारांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. ज्या अपेक्षेने मतदारांनी सन 2012 मध्ये हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रसने अलका साळुंके या एका सर्वसाधारण परिवारातील महिलेला उमेदवारी दिली होेती.
या आमनेसामने लढतीत मतदारांनी घराणेशाही नाकारत सर्वसाधारण असणार्या अलका साळुंके यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. सन 2017 लादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत ढिकले, शिवसेनेचे जगन्नाथ आगळे आणि अपक्ष उमेदवार संजय तुंगार यांच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने भरघोस मतांनी विजय मिळवला आणि शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला होता.
आगळे व तुंगार यांच्यात मतांची विभागणी झाल्याने ढिकलेंचा विजय सोपा झाला होता. त्यात पळसे गावातून चार उमेदवार असल्याने आगळे यांना विजयापासून दूर गावातच राहावे लागले होते. मात्र, आता 2025 च्या निवडणुकीत शिंदे-पळसे ही दोन गावे एकत्रित आली तर? यावर कार्यकर्ते मात्र आपापसांत चर्चा करत असून, एकत्रित आल्याने दोन्ही गावांचा मोठा फायदा होऊ शकतो, अशीदेखील चर्चा आता होत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांना या गटात 2019 व 2024 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकांत मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत यावेळीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते. भाजपदेखील पळसे गटात रणनीती आखत असल्याने येणार्या निवडणुकीत कोण कोणाबरोबर असेल की, स्वतंत्र लढतील, हे येणारी परिस्थिती ठरवेल, हे मात्र नक्की!
शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे यांनीदेखील उबाठाची उमेदवारी करण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांचा गिरणारे गट राखीव झाल्याने ते पळसे गटात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. नाशिक तालुका शेतकी संघाचे सभापती होऊन गेलेले शरद गायखे यांचीदेखील जोरदार तयारी सुरू आहे. माजी सदस्य यशवंत ढिकले, जयराम ढिकले यांनीदेखील आपली दावेदारी सांगितली आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे व आमदार सरोज आहिरे यांच्यासह पक्ष काय निर्णय घेतो त्यावर पुढील राजकीय गणिते मांडली जातील. शिवसेना शिंदे गटातून जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आणि संजय तुंगार, नवनाथ गायधनी या गटातून इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाने शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याची चर्चा असून, तेही संवाद दौर्यामधून नागरिकांना साथ घालत आहेत.
2017 चे विजयी उमेदवार

यशवंतराव ढिकले

उज्ज्वला जाधव

विजया कांडेकर
गट-गणात इच्छुक उमेदवार
जगन्नाथ आगळे, संजय तुंगार, अनिल ढिकले, शरद गायखे, दीपक गायधनी, यशवंत ढिकले, सुरेश ढिकले, नवनाथ गायधनी, राहुल धात्रक, अजित गायधनी, गणेश गायधनी, यशवंत ढिकले, मधुकर ढिकले, कुंदन ढिकले, बाळासाहेब तुंगार, भास्कर ढिकले, बाजीराव जाधव, किरण नरवडे, नामदेव ढिकले, नंदू नरवडे, सुनील हो. गायधनी, सुनील गायधनी, पवन कहांडळ.
पळसे गटात 12 गावे
पळसे, शिंदे, सिद्ध पिंप्री, चांदगिरी, जाखोरी, कालवी, गंगापाडळी, ओढा, शिलापूर, लाखलगाव, सुलतानपूर, विंचूरगवळी.
झालेली विकासकामे
♦ शिवरस्ता.
♦ गाव तेथे आंगणवाडी.
♦ जाखोरी ते जोंगली रस्ता.
♦ सभामंडप.
♦ मुख्य रस्ते.
♦ शिवार रस्ते.
प्रलंबित कामे
♦ शिंदे येथे छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय रस्ता.
♦ पिण्याच्या पाण्याची ठोस उपाययोजना.
♦ प्रमुख रस्ते.
♦ गावागावांतील उपरस्ते.
♦ अभ्यासिका.
♦ ग्रामीण शिवार रस्ते.
♦ आरोग्य केंद्रात सुविधेचा अभाव.
♦ कचर्याच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना महत्त्वाची.
♦ स्वच्छतागृह.
♦ राखीव भूखंडावर जॉगिंग ट्रॅक.
♦ नाना-नानी पार्क.
♦ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुधारणा.

मागील दहा वर्षांपासून गटात हवा तितका विकास होऊ न शकल्याने अनेक विकासात्मक कामे अपेक्षापेक्षा कमी झाली. रस्ते, अंगणवाड्यांवरच विकासाचे चक्र स्थिरावले आहे. नुसता माणूस चांगला असून चालत नाही, तर विकास करणारा पाहिजे. आजही अनेक कामे प्रलंबित असून, ज्या उमेदवाराकडे विकासाचा दूरदृष्टी आहे आणि तो कामे करू शकतो त्याने प्रतिनिधित्व करावे. केवळ राजकारणाची हौस म्हणून उभे राहू नये. शिवाय राजकारणाचे व्यावसायीकरण न करता जनतेची कामे होणे महत्त्वाचे आहे. – रमेशशेठ कटाळे, माजी सरपंच, चांदगिरी

जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका येत्या काही दिवसांत होणार आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने प्रचार करतो; परंतु याआधी जे निवडून गेले त्यांनी निवडून आल्यावर मागेदेखील फिरून पाहिले नाही. विकास हा शब्द फक्त नावापुरताच राहिला. एकाही गावात ठोस असे विकासाचे काम नसल्याने अनेक गावे मागील दहा- बारा वर्षांत अविकसित राहिली. येणार्या निवडणुकीत योग्य उमेदवार निवडून दिला जावा आणि गावाचा सर्वागीण विकास होणे गरजेचे आहे.
– संदीप आ. गायधनी, सामाजिक कार्यकर्ते, पळसे
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सिद्ध पिंप्री ते रानमळा रस्त्याची समस्या प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुका आल्या की विकासकामांचे आश्वासन देतात; परंतु सिद्ध पिंप्री ते रानमळा हा तीन किलोमीटरचा रस्ता अद्याप न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
– शंकर ढिकले, नागरिक, सिद्ध पिंप्री-रानमळा

ओढा गावाच्या हद्दीत असलेला हिंदुस्ताननगर हा भाग अजूनही विकासापासून वंचित आहे. येथे रस्त्यासह स्मशानभूमी, तसेच अंगणवाडी, बालकांना, ज्येष्ठ नागरिकांना मैदान विकसित होणे गरजेचे होते; परंतु या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे. केवळ निवडणुका सुरू झाल्या की, मगच राजकीय नेते येथे दौरे करतात.
– गणपत ढवळे, हिंदुस्ताननगर, ओढा

गावात वृद्ध नागरिकांसाठी नाना-नानी पार्क व्हावे. गेली दहा-बारा वर्षांपासून पळसे गटाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नसल्याने उमेदवार निवडून देताना याचाही विचार व्हावा. मागासवर्गीय समाजासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम हे लोकप्रतिनिधीचे असते. मात्र, येणार्या काळात जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याने वंचित घटकांसाठी कामे करणे गरजेचे आहे. येणार्या काळात तो ते काम करेल, ही अपेक्षा.
– मदन साळवे, ज्येष्ठ नागरिक, शिंदेगाव