चूक झाली पण….. आयुष्य संपले नाही

वाट चुकलेल्या विधिसंघर्षित बालकांचे
जीवन आता नव्या वळणावर!

विधिसंघर्षित बालकांचा प्रवास केवळ शिक्षा आणि पश्चात्तापाचा नसतो, तर परिवर्तनाचा आणि पुनर्जन्माचा असतो. समाजाने या मुलांना दोष देण्याऐवजी त्यांच्याकडे समजूतदारपणे पाहिले तर अनेक जीव पुन्हा उजळून निघतील.
ही मुले खरंच देवाघरची फुले आहेत. थोडी वादळात भरकटलेली पण पुन्हा सावरण्यासाठी सज्ज होत असलेली.
बच्चे मन के सच्चेे, लहान मुले देवाघरची फुले असे म्हटले जाते. हीच फुले कधी काट्यांमध्ये कळत नकळत अडकतात. मित्रांच्या नादी लागून, सोशल मीडिया, व्यसन, गरिबी, कौटुंबिक पार्श्वभूमी, भांडणे, कलह यामुळे काही विधिसंघर्षित वाट चुकलेली मुले आज नव्या आयुष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. निराशेच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी बाल न्यायमंडळ, महिला व बालविकास विभाग, समुपदेशक, निरीक्षणगृहात भेट देणारे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सकारात्मक मार्गदर्शनाने जशी काळ्या ढगांना सोनेरी कडा असते, तसे या विधिसंघर्षित मुलांच्या आयुष्यात सोनेरी किरण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिकून बनायचेय अधिकारी
मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, शिक्षण करिअर आणि विविध कलाकौशल्य, प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही मुले आता नव्या उमेदीने सद्गुणांचा प्रवास सुरू करीत आहेत. त्यांना आता त्यांची चूक समजली असून, ते आता उच्च शिक्षण घेऊन कोणाला प्रशासकीय अधिकारी बनायचे आहे तर कोणाला उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे. काही विधिसंघषिर्र्त मुलांच्या कहाण्या जीवनाचे ध्येय काय असावे हे दाखवून देत आहेत.

पालकांची जनजागृती अत्यावश्यक

नाशिक जिल्हा आज शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रगतीच्या आघाडीवर असला, तरी मुलांमध्ये वाढत चाललेली असंवेदनशीलता, सायबर गुन्हे, चोरी आणि हिंसाचार ही चिंतेची बाब ठरली आहे. यासाठी केवळ कायद्याचा बालेकिल्ला मजबूत करणे पुरेसे नाही, तर पालकांचे समुपदेशन आणि जनजागृतीही तितकीच आवश्यक आहे.
सातच्या आत घरात हा नियम फक्त मुलींसाठी नव्हे, तर मुलांसाठीही तितकाच काटेकोरपणे पाळला पाहिजे.
पालकांनी आपल्या मुलांचा मित्रपरिवार, त्यांचा मोबाइल वापर, सोशल मीडियावरील हालचाली याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलवर ते काय सर्च करतात, कोणते संपर्क ठेवतात, सायबर गुन्ह्यात गुंतलेले तर नाहीत ना, अश्लील सामग्रीची देवाणघेवाण करीत तर नाहीत ना, या सर्व बाबींची तपासणी पालकांनी वेळोवेळी केली पाहिजे.
किशोरवयीन अवस्थेत मुले भावनिक व मानसिकदृष्ट्या संवेदनशील असतात. या काळात पालकांनी टोकले, मर्यादा आखल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. पालकांचा धाक आणि संवाद मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखू शकतो. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये केवळ पालक सभा न घेता ‘पालकत्व कसे असावे’ या विषयावर विशेष कार्यशाळा घेणे काळाची गरज बनली आहे.
किशोरवयीन अवस्था 12 ते 18 वर्षांनंतर मुलांच्या वर्तनातील बदल, त्यांच्या कृतीमागील हेतू, कोण त्यांच्या संपर्कात येत आहे, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. काही वेळा चुकीच्या मार्गावर गेलेली मुले समाजाच्या वर्तुळाबाहेर फेकली जातात. अशा वेळी पालकांनी आणि समाजाने त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रशासनाने सखी सावित्री समितीप्रमाणे पालक समित्यांचीही स्थापना करावी, ज्यातून पालक मार्गदर्शन आणि सहाय्य मिळू शकेल.
मुलगा चुकला म्हणून त्याला कायमस्वरूपी संशयाच्या नजरेत पाहणे अन्यायकारक आहे. अशा मुलांना योग्य समुपदेशन, शिक्षण आणि नोकरीची संधी दिली पाहिजे, मात्र त्यासाठी पालकांची जबाबदारीही ठरली पाहिजे.

संगतीमुळे चुका
कुठलेही मूल जन्मताच गुन्हेगार नसते, परिस्थितीमुळे तो हे कृत्य करत असतो. यामध्ये आणि वडिलांची आर्थिक स्थिती, कौटुंबिक वाद, आई-वडिलांचे दुर्लक्ष आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बालक कोणासोबत राहत आहे हे त्याचे समन्वयक सवंगडी म्हणजेच मित्र. गेल्या दहा ते बारा वर्षांच्या अनुभवावरून असे जाणवत आहे की, बरीच बालके ही चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे चुका करतात किंवा त्यांच्याकडून काहीतरी कायद्याच्या विरोधात घटना घडत असते. मुलांमध्ये बदल होतात, ती सुधारतात. त्यांना वेळ देणे आणि चांगला मार्गदर्शक मिळणे आवश्यक आहे. अशी मुले ज्यावेळेस आमच्यासमोर येतात त्यावेळेस त्यांना समुपदेशनच्या माध्यमातून त्यांना असलेली अडचण समजावून घेऊन पुढील मार्गदर्शन केले जाते. बालकांकडून होत असलेल्या कायद्याच्या विरोधातील घटनांना समाजदेखील जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारीदेखील समाजाचीच आहे. बरीच मोठी माणसे कायद्याचा गैरवापर करून मुलांना सहभागी करून गुन्हे घडवून आणत आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण आणि शिक्षणानंतर रोजगार मिळाला तर कोणताही बालक गुन्हा करणार नाही, असे वाटते.
– समीरा येवले, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

समन्वय महत्त्वाचा
विधिसंघर्षित मुलांसाठी काय चांगले करता येईल, यासाठी एनजीओचे समन्वय करून देणे आदी कामे केले जातात. वणी, दिंडोरी, गंगापूर, वणी, म्हसरूळ, पेठ असे सहा पोलीस स्टेशन माझ्या कार्यक्षेत्रात येतात. जिल्हा महिला बालविकास विभागांतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष येथे कायदा व पर्यवेक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
– अ‍ॅड. ज्योती पठाडे

समुपदेशन सत्र
विधिसंघर्षित मुलांसाठी समुपदेशन सत्र दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या गुरुवारी घेतले जाते. बाल न्याय मंडळाच्या आदेशानंतर समुपदेशन केले जाते. लगेच बदल होत नसला तरी मुलांना योग्य मार्गदर्शन दिले जाते. आवश्यकतेनुसार मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाते. जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांकडूनही उपचार केले जातात. ग्रुप समुपदेशन, मोफत रोजगाराभिमुख कोर्सेस, बाह्य शिक्षणाची संधी आणि कायदेशीर सल्ला देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
– तन्वीर मन्सुरी, समुपदेशक, जिल्हा बालसंरक्षक कक्ष

बालकल्याण समितीचे कार्य
काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके म्हणजे 0 ते 18 वयोगटातील अनाथ, अक्षम पालकांची, एकल पालक असलेली किंवा हरवलेली मुले. अशा मुलांसाठी निर्णय घेणारी यंत्रणा म्हणजे बालकल्याण समिती. 12 ते 18 वयोगटातील गुन्ह्याशी संबंधित मुले विधिसंघर्षित बालके म्हणून ओळखली जातात, ज्यांची काळजी बाल न्याय मंडळ घेतं. पोलिसांनी अशा बालकांना न्याय मंडळासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना जामीनावर सोडले जाते. जामीनानंतर त्यांचा सुधारण्याचा प्रवास सुरू होतो. शिक्षण, वर्तन आणि शैक्षणिक प्रगती तपासली जाते. सुधारणा दिसल्यास त्यांना निर्दोष सोडले जाते किंवा समज देऊन मुक्त केले जाते. बाल न्याय मंडळ शिक्षेऐवजी पुनर्वसन, समुपदेशन आणि विकासावर भर देते, जेणेकरून ही मुले पुन्हा चुकीच्या मार्गावर न जाता समाजातील जबाबदार नागरिक बनू शकतील.

विधिसंघर्षित बालकांची उपेक्षा
काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. परंतु, चोरी किंवा गुन्ह्यांत अडकलेल्या विधिसंघर्षित बालकांसाठी काम करणार्‍या संस्थांची संख्या अत्यंत कमी आहे. या मुलांच्या पुनर्वसनासाठी तात्पुरते समुपदेशन केले जाते, मात्र दीर्घकालीन प्रयत्नांची कमतरता आहे. या मुलांबद्दल समाजात आणि संस्थांमध्ये भीती व पूर्वग्रह असल्याने कोणी पुढाकार घेत नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन अपूर्ण राहते आणि हीच या मुलांच्या जीवनातील खरी शोकांतिका ठरते.

सामाजिक तपासणी अहवाल
प्रत्येक पोलीस स्टेशनसाठी पर्यवेक्षक अधिकारी नियुक्त असतो (नाशिक जिल्ह्यात एकूण 53 पोलीस ठाणे). या अधिकार्‍यांमार्फत मुलाचा सामाजिक तपासणी अहवाल तयार केला जातो. या अहवालात 47 मुद्द्यांवर आधारित माहिती असते – मुलाची मानसिकता, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक पार्श्वभूमी, शिक्षण, आर्थिक स्थिती आदींचे मूल्यमापन केले जाते. या अहवालावर आधारित न्यायाधीश व सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जातो. काही प्रकरणांत मुलांना मुक्त करण्यात येते, तर काही गंभीर प्रकरणांत त्यांना 14 ते 30 दिवस निरीक्षणगृहात ठेवले जाते.

शिक्षेचा कालावधी
विधिसंघर्षित बालक निरीक्षणगृहात आल्यानंतर त्याची भावनिक अवस्था नाजूक असते. पालकही घाबरलेले असतात. प्रोबेशन अधिकारी अहवाल देतात. बालकाला 14 दिवस, गंभीर गुन्ह्यात 30 दिवस ठेवले जाते. किरकोळ गुन्ह्यांना 3 वर्षांपर्यंत, गंभीर गुन्ह्यांना 3 ते 7 वर्षे, तर अघोर गुन्ह्यांना 7 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा असते.

विधिसंघर्षित बालकाचे वडील सांगतात,
आम्ही गावाकडे मोलमजुरी करतो. झालेल्या चुकांमधून मुलाने आणि आम्हीही धडा घेतला आहे. त्याच्या भविष्यासाठी आता आम्ही त्याच्या सोबत आहोत.

विधिसंघर्षित बालकाची आजी सांगते की, नातू अभ्यासात अत्यंत हुशार असून, दहावीत त्याला 83 टक्के गुण मिळाले होते. मात्र, मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे तो एका प्रकरणात अडकला. आता त्याच्यात चांगले बदल झाले असून, तो अधिकारी बनून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करीत आहे.

समाजाने या गोष्टी करायला हव्यात

1
बरीच मोठी माणसं ज्यांना कायदा माहिती आहे अशी लोक बालकांचा गुन्ह्यासाठी वापर करून घेत आहेत. 18 च्या आतील बालकांना शिक्षा होत नाही, हे माहिती असल्यामुळे लोक त्यांचे काम या बालकांकडून करून घेतात हे चुकीचे आहे.
2
काही बालके आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे शिक्षण सोडतात. सदर बालकांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
3
सात-आठ वर्षांचे बालक देखील व्यसन करते. अशा वेळेस त्या बालकांना व्यसनासाठी लागणारे पदार्थ देणारे व्यावसायिक व्यापारी यांचीही नैतिक जबाबदारी आहे. इतक्या लहान वयातील बालकांना आपण या अमली पदार्थाची विक्री करतो आहे हे कुठेतरी थांबायला हवे आहे.
4
बालकाला पैशाचे किंवा खाण्यापिण्याच्या वस्तूंचे किंवा अमली पदार्थांची लालच दाखवली जाते आणि त्यांच्याकडून कायद्याच्या विरोधात समाजविघातक कृत्य घडून आणले जाते हे थांबायला हवे.
5
समाजात आपण बघत आहोत की, रस्त्यावरती काही घटना घडली तरी सर्व बघायची भूमिका घेतात. कोणीही सदर घटना थांबवण्याचा प्रयत्न करत नाही.

विधिसंघर्षित बालके म्हणतात…

1 पोलिस अधिकारी व्हायचेय
आमच्या कुटुंबात आई-वडील शेतमजूर आहेत. दोन भाऊ आहोत. मी एफ.वाय. बी.एस्सी. शिक्षण घेत असून, एनसीसी आणि पोलिस भरती प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात आर्मी ऑफिसर किंवा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. शेजार्‍याशी झालेल्या किरकोळ भांडणातून माझ्यावर आरोप झाले. पण, जामीन मिळाल्यानंतर समुपदेशन झाले. येथे मला नोकरीच्या संधी व उपयुक्त कोर्सेसबद्दल मार्गदर्शन मिळाले. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे पाहायला शिकलो आणि आता माझ्या करिअरकडे नव्या उत्साहाने वाटचाल करत आहे.

2 सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचेय
कुटुंबात आई-वडील, आजी, बाबा व भाऊ असे आहे. वडील बांधकाम मजूर आहे. तो बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे व सीईटीची तयारी करत आहे. दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून शेजार्‍यांनी संशयावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. बाल न्याय मंडळातील समुपदेशनातून त्याने जीवनाचे धडे घेतले. आता तो सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे व पुढे एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देण्याचे स्वप्न पाहतो. तो सांगतो की, चुकीच्या मित्रांपासून दूर राहा, वडीलधार्‍यांचे ऐका आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सध्या त्याचा दिनक्रम घर ते लायब्ररी आणि लायब्ररी ते घर असा असून, तो करिअरकडे एकाग्र आहे.

3 सुधारायचेच आता, नाही थांबायचं
कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहे. तिघेही कंपनीत काम करतात. मला बळजबरीच्या गुन्ह्यात चुकीचे आरोप लावण्यात आले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना झालेल्या घटनेनंतर सुधारगृहात आणण्यात आले. येथे समुपदेशन व मार्गदर्शनामुळे सकारात्मक बदल झाला. स्वतःतील चुका ओळखून आता वरिष्ठ अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. औद्योगिक प्रशिक्षणात आपल्या ट्रेडमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. सेवाभावी संस्था, शिक्षक आणि क्रीडाशिक्षकांच्या मार्गदर्शनाने नवे आयुष्य मिळाले आहे. आता संधी मिळाली आहे, चुका पुन्हा होऊ देणार नाही.

4 चुकीच्या संगतीने बिघडलो, पण आता घडलो
मी अनाथाश्रमात राहतो, एक भाऊ आहे. आयटीआय शिक्षण घेतले असून, पोलीस अकॅडमीमध्ये दाखल झालो होतो. दुसर्‍या राज्यातून आलेल्या एका मुलाशी ओळख झाली आणि गैरसमजामुळे माझ्यावर पोस्को गुन्हा दाखल झाला. बाल न्याय मंडळाच्या मार्गदर्शनाने माझ्यात बदल झाला आहे. आता पुन्हा अकॅडमी जॉइन करून पोलिस भरतीची तयारी करीत आहे. इतर मुलांना एकच सांगेल – चुकीच्या मित्रांची संगत टाळा आणि आयुष्य गांभीर्याने जगा.

5 आयटीआय करून नोकरी करायचीय
मी दहावीला आहे. कुटुंबात आई, वडील, बहीण व आजी आहेत. मोबाइल गेम खेळण्याच्या आवडीमुळे मित्रांच्या संगतीत चुकीचे फोटो मोबाइलमध्ये अपलोड झाले. त्यातून गुन्हा दाखल झाला. आता तो आयटीआय करून इलेक्ट्रिकल क्षेत्रात नोकरी करण्याचा निर्धार ठेवत आहे. अडचणींवर मात करून नव्या जीवनाची सुरुवात करण्याची जिद्द मनाशी पक्की केली आहे.

नव्या स्वप्नांकडे पडती पाऊले…

एक चुकीचा निर्णय, पण आयुष्य संपलेले नाही.. ही ओळ अगदी नेमकी लागू होते त्या विधिसंघर्षित बालकांवर, जे निरीक्षणगृहात येतात. गुन्हा केल्याचा ठपका असला तरी या बालकांना समाज, न्यायालय आणि समुपदेशक यांच्या माध्यमातून आयुष्य नव्याने घडविण्याची दुसरी संधी मिळते.
विधिसंघर्षित बालकांना प्रथम बालकल्याण समिती कार्यालय, निरीक्षणगृह किंवा बालगृह येथे आणल्यानंतर त्यांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा सखोल अभ्यास केला जातो. त्या मुलाने कोणत्या परिस्थितीत चुकीचे कृत्य केले, त्यामागील कारणे काय होती, हे जाणून घेतले जाते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना समुपदेशन व मार्गदर्शन दिले जाते.
समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक मुलांमध्ये सकारात्मक बदल होताना दिसतात. त्यांच्या वर्तनात सुधारणा झाल्यानंतर पालकांकडूनही फीडबॅक घेतला जातो. काही वेळा मुलांना नक्की आपल्यासोबत काय होईल किंवा परिस्थितीचे गांभीर्य समजून सांगितल्यावर आणि कोर्टाच्या रिपोर्टमध्ये त्यांचा उल्लेख होईल असे सांगितले जाते, तेव्हा ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. न्यायाधीश आणि विभागीय अधिकारी देखील या बालकांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. अनेक मुलांनी आपल्या चुका ओळखल्या आहेत. त्यांनी आता आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. काहींनी पोलिस अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील कोर्स पूर्ण करून नोकरी मिळवण्याचे ध्येय ठरवले आहे. काहींना त्यांच्या प्रयत्नांबद्दल पारितोषिके आणि सन्मानही मिळाले आहेत.
यापासून परावृत्त करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. न्यायालय एकदा त्यांना सुधारण्यासाठी संधी देते, पण जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा जुने वातावरण त्यांना वेढते. अशा वेळी पालकांनी मुलांना योग्य दिशा देणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्यावर विश्वास दाखवणे आवश्यक आहे.
निरीक्षणगृहातील अधिकारी, समुपदेशक आणि प्रोबेशनरी ऑफिसर यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक विधिसंघर्षित बालकांनी आयुष्याला सकारात्मक दिशा दिली आहे. अशा मुलांनी शिक्षण, क्रीडा, कला यांत प्रगती करत विविध बक्षिसे आणि सन्मान मिळविले आहेत. काही मुलांनी स्वतःहून पुढे येऊन आपली यशोगाथा सांगत इतर मुलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

दहापैकी आठ जण चांगल्या वळणावर

विधिसंघर्षित दहा बालकांपैकी सुमारे आठ जण योग्य मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, उर्वरित दोन बालके गुन्हेगारी किंवा चुकीच्या वर्तनाकडे पुन्हा वळतात. अशा मुलांना सतत समुपदेशन केले जात असले तरी त्यांच्यातील बदल दिसून येत नाही. त्यांना पश्चात्ताप असतो, पण परिस्थिती आणि वातावरण त्यांना पुन्हा चुकीच्या मार्गावर ढकलते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *