झटापटीत विहिरीत पडून एकाचा बिबट्यासह अंत

सिन्नर : प्रतिनिधी
कष्ट, घाम आणि रोजच्या मजुरीवर जगणार्या एका शेतमजुराच्या आयुष्याचा शेवट इतका विदारक असेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवडे (ता. सिन्नर) येथे रविवारी सकाळी घडलेली घटना केवळ अपघात नसून, ग्रामीण भागातील माणूस-वन्यजीव संघर्षाचे भयावह वास्तव उघड करणारी ठरली. न्याहारीसाठी बसलेल्या शेतमजुरावर पाठीमागून बिबट्याने झडप घातली. जीव वाचवण्यासाठी झालेल्या झटापटीत शेतमजूर आणि बिबट्या थेट विहिरीत कोसळले आणि दोघांचाही मृत्यू झाला.
सावता माळीनगर येथील गोरख लक्ष्मण जाधव (वय 43) शिवडे येथील शेतकरी गणपत अमृता चव्हाणके यांच्या गट नंबर 811 मधील शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी साधारण दहा वाजता विहिरीलगतच्या आंब्याच्या झाडाखाली बसून ते न्याहारी करत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मानगुटीवर झडप घातली. क्षणात शांत शिवारात किंकाळ्या, धावपळ आणि जीवघेणी झटापट सुरू झाली.
जाधव आणि बिबट्यामध्ये प्रचंड झटापट झाली. अवघ्या दहा फुटांवर असलेली, मात्र कठडे नसलेली विहीर मृत्यूचा सापळा ठरली. झटापटीत दोघेही थेट विहिरीत कोसळले. शेजारील शेतात कांद्याची रोपे उपटणार्या महिलांनी हे दृश्य पाहताच मदतीसाठी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, विहिरीत असलेल्या विद्युत पंपाच्या फाउंडेशनवर थकलेला बिबट्या बसल्याने कुणालाही खाली उतरता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ’आधी शेतमजुराचा जीव घेणार्या बिबट्याला ठार करा, त्यानंतरच मृतदेह बाहेर काढा,’ अशी आक्रमक भूमिका स्थानिक ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. तब्बल तीन ते चार तास सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, मोबाईल स्क्वॉडच्या सातारकर यांच्यासह वनविभाग आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.अखेर वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. मात्र पिंजरा बाहेर काढण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. त्यानंतर पट्टीचे पोहणारे गोविंद तुपे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुमारे 6 परस पाणी असलेल्या विहिरीत उतरून त्यांनी गोरख जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.दरम्यान, मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याच्या नाका-तोंडात पाणी गेले आणि अखेर त्याचाही मृत्यू झाला. बिबट्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मोहदरी वन उद्यानात पाठवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी तैनात होते.
A morsel of breakfast in the mouth; death on the neck!