प्रभाग क्रमांक 12
उच्चभ्रू वसाहत ते झोपडपट्टी परिसरातील समस्या कायम
झोपडपट्टी ते उच्चभ्रू वसाहत असा संमिश्र असलेल्या प्रभाग 12 मध्ये मागील पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. मागील वेळेस भाजपा आणि काँग्रेसने या प्रभागात बाजी मारली होती. परंतु यावेळी काँग्रेसच्या मंडळींनी इतर पक्षांची वाट धरल्याने अशा परिस्थितीत आहे त्या जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेसला पेलावे लागणार असतानाच भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणार्या इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा येथे चांगलाच कस लागणार असला, तरी पक्ष बदलल्याने विजयाचे गणित कसे जमून आणले जाते, यावरच येथील लढतीचे चित्र अवलंबून आहे.
प्रभागात मागील पाच वर्षांत विकासकामे झाली असली, तरी उच्चभ्रू वसाहतीतील काही समस्या आजही जैसे थे आहेत. तिडके कॉलनी भागातील अंतर्गत रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. एसएसके हॉटेल ते राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ही समस्या गेल्या पाच वर्षांत सुटलेली नाही. या भागात गॅस पाइपलाइनसाठी रस्ते खोदण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याची व्यवस्थित डागडुजी न केल्याने चांगल्या रस्त्यांची गॅस कंपनीने पुरती वाट लावून टाकली आहे. झोपडपट्टीचाही हा परिसर असल्याने तेथील अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. अल्पसंख्याक मतदार या भागात राहत असल्याने सर्वांचेच लक्ष या समुदायाकडे केवळ मतदानापुरतेच असते. त्यामुळे स्लम एरियाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. आरोग्यविषयक समस्या, ड्रेनेजचा प्रश्न या भागात गेली पाच वर्षे नागरिकांना भेडसावत असताना लोकप्रतिनिधींनी फारसे या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
सध्याची राजकीय स्थिती
नाशिक महानगरपलिकेचा प्रभाग क्रमांक 12 हा उच्च मध्यमवर्गीय परिसर आहे. 2017 च्या मनपा निवडणुकीत या प्रभागातून शिवाजी गांगुर्डे, प्रियंका घाटे हे भाजपाकडून, तर डॉ. हेमलता पाटील आणि समीर कांबळे हे काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र, गेल्या आठ वषार्ंत प्रभागाची परिस्थिती पूर्ण बदलली असून, काँग्रेसमध्ये असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गट व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. समीर कांबळे यांनी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नाशिक महानगरपालिकेसाठी महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती असलेला प्रभाग क्रमांक 12 उच्च मध्यमवर्गीय मतदार असलेल्या या प्रभागात गेल्या वेळी संमिश्र कौल मिळाला होता. भाजपाकडून मागील वेळेस निवडणूक लढविलेले पुन्हा यावेळी रिंगणात उतरण्याची तयारी करीत असतानाच भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, धनंजय बेळे, प्रेरणा बेळे, किशोर घाटे, शिवाजी गांगुर्डे, समीर कांबळे यांनीही तयारी चालवली आहे. भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. काँग्रेसला या प्रभागात नवीन चेहर्यांना संधी द्यावी लागणार आहे. याशिवाय डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत सुरुवातीला शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. परंतु काही महिन्यांतच त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील झाल्या. काँग्रेसचे समीर कांबळे यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले. आता भाजपात येथे उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रियंका घाटे यांच्याबरोबरच त्यांचे वडीलही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. एकूणच वाढलेल्या या इच्छुकांमुळे या प्रभागात उमेदवारीसाठी मोठे घमासान होणार आहे. त्यात नाराजांची संख्या वाढल्यास त्याचा फटका कुणाला बसणार? याचे उत्तर आगामी काळात मिळू शकेल.
असे आहे आरक्षण
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित जागा
12 क, 12 ड
अनुसूचित जाती पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग
12 अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग
12 ब
प्रभागातील प्रमुख समस्या
गजबजलेला परिसर असल्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न
वाहनतळांचा अभाव, रस्त्याची दुर्दशा
जॉगिंग ट्रॅक व उद्यानाची झालेली दुरावस्था
विद्यमान नगरसेवक

गांगुर्डे शिवाजी त्र्यंबक

पाटील हेमलता निनाद
कांबळे समीर उत्तमराव
घाटे प्रियंका किशोर
इच्छुक उमेदवार
प्रियंका घाटे, किशोर घाटे, समीर कांबळे, शिवाजी गांगुर्डे, सुजाता डेरे, हेमलता पाटील,सीमा रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, धनंजय बेळे, प्रेरणा बेळे, प्रशांत जाधव, सोपान कडलग, गणेश कांबळे, प्रकाश दीक्षित, मोहन सुतार, विनोद येवले, अमोल गांगुर्डे, मिलिंद सावंत, चित्रेश वसपटे, किशोर तेजाळे, धनंजय निकाळे
प्रभागाची व्याप्ती
महात्मानगर, लव्हाटेनगर, तिडके कॉलनी, टिळकवाडी, शरणपूर, विसे मळा, समर्थनगर, उत्कर्षनगर, महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, एचपीटी कॉलेज, येवलेकर मळा, विसे मळा, उत्तर गंगापूररोड, भोसला मिलिटरी कॉलेज परिसर, पी अॅण्ड टी कॉलनी, क्रांतीनंगर,
2011 नुसार लोकसंख्या
50,257
अनुसूचित जाती
6454
अनुसूचित जमाती
3323
प्रभागातील विकासकामे
रस्ते व गटारी, उद्यानांचे सुशोभीकरण, प्रभागात सीसीटिव्ही, जॉगिंग ट्रॅक विकास, उत्कर्षनगर रस्त्याचे डांबरीकरण, आदिवासी सोसायटी मंदिर सुशोभीकरण, क्रांतीनगरला शौचालय, महात्मानगर, पीअॅण्ड टी कॉलनीत सीसीटिव्ही, संविधान शिल्प, क्रांतीनगरला समाजमंदिर. जॉगिंग ट्रॅक विकसित.
झोपडपट्टी परिसराचा अद्याप विकास नाही
प्रभागातील झोपडपट्टीचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. आरोग्यविषयक समस्या, ड्रेनेजचा प्रश्न या भागात गेली पाच वर्षे नागरिकांना भेडसावत आहे. असे असताना लोकप्रतिनिधींनी फारसे या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही.
इच्छुक म्हणतात…
वाहतुकीची समस्या
या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. त्याप्रमाणे वाहनतळ नसल्याने वाहतुकोंडीच्या समस्येत भर पडते. या प्रमुख समस्या सोडविण्यासाठी या प्रभागात उडानपुल होणे गरजेचे आहे. प्रभागाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. प्रभागातील समस्या सोडविण्यसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे.
धनंजय बेळे, उद्योजक
समस्या मार्गी लावल्या
नगरसेवक असताना आणि नसतानाही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच तत्पर आहे. प्रभागात सायकल ट्रॅकची निर्मिती करण्याात आली. तसेच प्रभागातील नागरिकांना मुलभूत समस्या निर्माण होऊन नयेत यासाठी ड्रेनेजची समस्याची कामे केली, पाणी पुरवठा रस्त्याची कामे करण्यात आली होती.
हेमलता पाटील, माजी नगरसेविका राष्ट्रवादी कॉग्रेस
मोकळ्या भूखंडांचा योग्य वापर नाही
प्रभागात विविध समस्या आहेत. जॉगिग ट्रॅकची दुरावस्था झालेली आहे. उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे नागकिरांना प्रभागात उद्यान जॉगिग ट्रॅक असून देखील त्यांचा वापर करताना अडचणी येतात. गजबजलेला प्रभाग असला तरी प्रभागात महानगरपालिकेची काही मोकळी भुखंड आहेत. या भुखंडाचा वापर महिलांसाठी ग्रीन जीम , योगा हॉल करण्यासाठी होऊ शकतो, प्रभागाचा सर्वांगिण विकास करण्याचा मानस आहे. सीमा ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस
वाहतुकीची मोठी समस्या
नाशिक मनपात दोन टर्म या प्रभागातून नगरसेविका राहिलेले आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या सत्ताकाळात नाशिक शहराचे मॉडेल रस्ते प्रभाग 12 मधील दाखवले जात होते. मात्र, आता प्रभागातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. पाइपलाइनच्या कामांसाठी सातत्याने रस्त्यांची तोडफोड करण्यात येते. प्रभागात वाहतुकीची मोठी समस्या आहे. प्रभागात जॉगिंग ट्रॅक, उद्याने आहेत. मात्र, त्यांचीही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. नगरसेविका असताना ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क हा प्रकल्प सुरू केला. नंदिनी नदीची संरक्षक भिंत बांधली. अभ्यासिका बांधल्या. जुन्या- नव्याची सांगड घालून प्रभागाचा विकास करण्याचा मानस आहे.
– सुजाता डेरे, माजी नगरसेविका, मनसे
पार्किंगची समस्या गंभीर
कॉलेज रोड परिसरात उच्चभ्रूंची लोकवस्ती आहे. मात्र, या भागात पार्किंगची समस्या मोठी तीव्र बनली आहे. सुसाट वेगाने धावणारी वाहने आणि कॉलेज रोडवरील टवाळखोरांचा उपद्रव गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढलेला आहे. प्रभाग भयमुक्त करण्याची गरज आहे. या भागात सातत्याने चोर्या होत असतात. त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
– वर्षा येवले
शौचालयांची समस्या बिकट
प्रभाग 12 मध्ये काही भागांत सार्वजनिक शौचालयांची समस्या गंभीर बनलेली आहे. काही भागात घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या हेतूने आगामी मनपाची निवडणूक लढविण्याचा मानस आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून या भागातील नागरिकांच्या विविध समस्या सातत्याने सोडवत आहे. – विनोद येवले
वाहतुकीची समस्या
मोकळ्या भूखंडांचा योग्य वापर नाही
वाहतुकीची मोठी समस्या
पार्किंगची समस्या गंभीर
शौचालयांची समस्या बिकट