नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात 2027 साली होणार्या सिहंस्थ कुंभमेळाव्यासाठी महापालिकेनेे तपोवनात रुग्णालय उभारावे. तसेच शहरातील उघड्या वीज तारा भूमिगत करण्यासाठी नियोजन समितीतून निधी द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार सीमा हिरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येणार असून तपोवन भागात एकही हॉस्पिटल नाही. त्यामुळे महापालिकेचे या भागात अद्ययावत हॉस्पिटल उभारावे अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या गटाअंतर्गत धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करतील. यामध्ये अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येईल. रूग्णांवर शासनाच्या विविध योजनां मधून मोफत उपचार केले जातील. तसेच त्यांना घरापासून नेण्याची व आणून सोडण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे ना. भुसे यांनी सांगितले. शहरात मनपाच्या मदतीने धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार असून जनतेला त्यांच्याच घराजवळच्या परिसरात जागेवरच विविध दाखले, रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती यावेळी दादा भुसे यांनी दिली.