नूतन इमारतीतून गतिमान प्रशासनाची नवी सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जि.प.च्या इमारतीचे उद्घाटन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषदेची नूतन प्रशासकीय इमारत ही राज्यातील सर्वांत मोठी आणि सुंदर इमारत असून, या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला व गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
व्यक्त केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुहास कांदे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार दिलीप बोरसे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या इमारतींपैकी सर्वांत सुंदर अशी ही इमारत आहे. जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी यांनी या कामगिरीबद्दल अभिनंदनास पात्र आहेत. सुसज्ज सुविधांनीयुक्त असलेली ही इमारत जनसामान्यांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यवरांसह इमारतीची पाहणी केली. सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून उद्घाटन सोहळ्याची औपचारिक सुरुवात केली.
यावेळी ‘रूट्स ऑफ चेंज’ या त्रैमासिकाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी तसेच विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी जोशी यांनी केले. प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी आभार मानले.

मंत्रालय येथेच शिफ्ट  करू ः फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकरोडवरील जिल्हा परिषदेचे उद्घाटन भाषणादरम्यान इमारतीचे कौतुक करताना शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना उद्देशून म्हणाले की, ही जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वांत मोठी इमारत असून, काही दिवसांनी दादाजी भुसे आपण येथेच मंत्रालय शिफ्ट करू, असे म्हणताच व्यासपीठावरील सर्व अधिकारी, आमदार, खासदारांसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निवडणुकांमध्ये आम्ही सोबत लढणार आहोत, असे सांगून शंभर प्लसचा नारा दिला असताना, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नात भाजपाचे शंभर की युतीचे शंभर, असे उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकार्‍यांच्या बैठकीदरम्यान फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. मध्यंतरीच्या काळात मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र येणार, तसेच युतीअंतर्गत धुसफूस, युतीतील तीनही पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी याबाबत चित्र स्पष्ट नसले तरी स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. यावर काल जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावेळी फडणवीसांचे सूचक वक्तव्य बरेच काही सांगून गेले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून लढणार हे यातून दिसून आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *