नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य विभागाने गोवर नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले त्वरेने उचललेली असून, मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पाठविलेल्या गोवरसदृश आजाराने ग्रस्त ८ रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांपैकी सात रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून, एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे
गोवरचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला रुग्ण येवल्यातील विखरणी या गावचा असून, त्याला येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या रुग्णावर उपचार करण्यात आले असून, तो गोवरपासून मुक्त झाला आहे रुग्णालयाकडून त्याला घरी सोडण्यात आले आहे.गावेरला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या बालकांना थंडी, तापाचा त्रास होत आहे किंवा अंगावर पुरळ आलेले आहेत त्यांनी त्वरित रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गोवर हा आजार पूर्णपणे बरा होतो. गोवर बरा होण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.
गावोगावी आशासेविका, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत वंचित लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, जी बालके लसीकरणापासून वंचित असतील त्यांनी लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांशी, रुग्णालयाशी संपर्क साधावा, गोवरसंबंधी जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील गावातील तालुक्यातील इतर रहिवाशांना त्यांच्या घरातील लहान मुलांच्या लसीकरणासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले आहे.