मंत्री गिरीश महाजनांच्या कानउघाडणीनंतरही बंडखोरीची धग कायम
वैभव बागूल
विकी जाधव
सुनील बागूल
शंभूराज खैरे
तब्बल नऊ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर चांदवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुरळा आता शिगेला पोहोचला आहे. बुधवारी (दि. 26) उमेदवारांना अधिकृतरीत्या चिन्हांचे वाटप झाल्याने प्रचाराच्या तोफा खर्या अर्थाने धडाडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना केवळ स्वतःचा चेहरा दाखवून मतदारांना साद घालावी लागत होती, मात्र आता त्यांच्या हातात अधिकृत निशाणी आल्याने प्रचाराचा वेग दुप्पट झाला आहे. ही निवडणूक दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
भाजपची बाजू सावरण्यासाठी राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच चांदवडमध्ये येत तातडीची आढावा बैठक घेतली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट करण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांनीही चांदवडचा दौरा करत पदाधिकार्यांशी संवाद साधला. दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांनी आढावा घेऊन कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला असला, तरी बंडखोरीची धग अद्याप कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
थेट जनतेतून निवडल्या जाणार्या नगराध्यक्षपदासाठी 10 उमेदवार रिंगणात असून, बुधवारी चिन्ह हाती आल्यानंतर लढतीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपकडून वैभव विजय बागूल हे कमळ चिन्हावर नशीब आजमावत आहेत, तर महायुतीचा घटक पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सुनील अंबादास बागूल यांना घड्याळ चिन्हावर रिंगणात उतरवल्याने महायुतीतच सामना रंगला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतही एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विकी दिलीप जाधव हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जात आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शंभूराजे शंकरराव खैरे यांच्या हाती मशाल आहे. या प्रमुख पक्षांच्या लढतीत सर्वांत जास्त चर्चा रंगली आहे ती अपक्ष उमेदवार राजेश रमेश अहिरे (राजाभाऊ अहिरे) यांची. त्यांना कपबशी हे चिन्ह मिळाले असून, त्यांची उमेदवारी राजकीय गणिते बिघडवणारी ठरू शकते. याशिवाय राकेश अहिरे (रिक्षा), जयेश पारवे (गॅस सिलिंडर), गोपी बडोदे (सीलिंग फॅन), रूपेश बागूल (नारळ) आणि अशोक हिरे (बॅट) हे उमेदवारही आता आपापल्या चिन्हांसह मतदारांच्या दारी धडकणार आहेत.
या निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता, भाजपचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर आणि नुकतेच भाजपवासी झालेले माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मनोमिलनानंतरही भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. गिरीश महाजन यांच्या आढावा बैठकीतही या बंडखोरीचा सूर उमटला होता, तर खासदार भगरे यांनीही आघाडीतील विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक पातळीवर मनांची जुळवाजुळव करणे हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. विशेषतः प्रभाग 7 ब मध्ये माजी आमदार कोतवाल यांचे पुत्र राहुल कोतवाल यांच्याविरोधात भाजपचेच निष्ठावंत जितेंद्र (देवा) पाटील यांनी दंड थोपटल्याने ही लढत बाप से बेटा सवाई ठरते की बंडखोरी भारी पडते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच प्रभाग 10 अ आणि 10 ब मध्ये होणार्या थेट लढती आणि प्रभाग 8 व 9 मध्ये झालेली उमेदवारांची गर्दी, यामुळे निकालाचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
मैदानावरच्या या लढतींसोबतच यंदाची निवडणूक हायटेक पद्धतीने, म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनवरही तेवढ्याच ताकदीने लढली जात आहे. चिन्हवाटप होताच सोशल मीडियावर ग्राफिक बॉम्ब पडू लागले असून, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि स्टेटसच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दिवसा उन्हाचा कडाका आणि प्रचाराचा धुरळा असला तरी, रात्रीच्या वेळी मात्र शहरात गुप्त बैठका आणि पाटर्या यांना उधाण आले आहे. वरकरणी एकमेकांचे विरोधक दिसणारे नेते रात्रीच्या अंधारात गळ्यात गळे घालत असल्याच्या चर्चांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण
केला आहे.
एकीकडे नेत्यांची धावपळ आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असताना, दुसरीकडे मतदारराजा मात्र अत्यंत शांत आणि संयमी भूमिकेत आहे. “येऊ द्या, पाहू, विचार करू” अशी सावध प्रतिक्रिया मतदारांकडून मिळत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. विशेष विश्लेषणात्मक बाब म्हणजे, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेस पक्ष नसल्याने त्यांच्या पारंपरिक विचारसरणीच्या आणि हक्काच्या मतांचे काय होणार, हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट
ठरणार आहे. अखेरीस चांदवडच्या या राजकीय महाभारतात कोणाचा अभिमन्यू होणार आणि कोण विजयी होणार, हे 10 उमेदवार आणि 84 नगरसेवकांच्या नशिबाचा फैसला आता 2 डिसेंबरला मतपेटीत बंद होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन कोणाच्या अंगावर गुलाल पडणार, हे
स्पष्ट होईल.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…