नाशकात रंगांची उधळण

पारंपरिक रंगपंचमीचा सर्वत्र उत्साह पाहण्यास मिळाला

♦      ♦    ♦      ♦ 
धुळवडीच्या उत्सवानंतर रविवारी (दि. 8 मार्च) नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी झाली. राज्यातील अनेक भागांत धुळवडीलाच रंग खेळण्याची परंपरा असली, तरी नाशिकमध्ये मात्र धुळवडीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे शहरात रंगांची उधळण , तरुणाईचा जल्लोेष आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नाशिकमधील रंगपंचमीचे प्रमुख आकर्षण म्हणजे, पेशवेकालीन रहाडी. जवळपास 300 वर्षांची परंपरा असलेल्या या रहाडींमध्ये रंगपंचमी खेळण्याची परंपरा पेशव्यांच्या काळापासून सुरू असल्याचे सांगितले जाते. जुन्या नाशिक परिसरात असलेल्या या रहाडी म्हणजे साधारणपणे 12 बाय 12 फुटांचा आणि सुमारे आठ फूट खोल असलेला हौद असतो. या हौदात नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमी खेळली जाते.
पूर्वी जुन्या नाशिकमध्ये 14 रहाडी अस्तित्वात होत्या. कालांतराने त्यांपैकी काही रहाडी नष्ट झाल्या असल्या, तरी आजही शहरात पाच रहाडी रंगपंचमीच्या दिवशी विशेषतः खुल्या केल्या जातात. या रहाडींमध्ये तयार होणारा रंग पूर्णपणे नैसर्गिक असतो. विविध फुले, वनस्पती आणि नैसर्गिक घटकांपासून हा रंग तयार केला जातो. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्याची ही परंपरा आजही जपली जात आहे.
या रहाडींमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी जुन्या नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. पारंपरिक पद्धतीने रंग खेळण्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांसह अनेक पर्यटकही या ठिकाणी दाखल होतात. ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोेषात आणि आनंदी वातावरणात ही रंगपंचमी साजरी केली जाते. याशिवाय, शहरातील विविध भागांतही रंगपंचमीच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मित्रपरिवार आणि आप्तस्वकीयांसोबत रंगांची उधळण करत हा सण साजरा केला. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम, तसेच सामूहिक रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले .
दरम्यान, रंगपंचमीच्या उत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली . प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि रहाडी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला . पारंपरिक रहाडी, नैसर्गिक रंग आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे नाशिकची रंगपंचमी ही राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक मानली जाते. आज पुन्हा एकदा या परंपरेनुसार नाशिककर रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी झाली.
A riot of colors in Nashik

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *