इंदिरानगर |वार्ताहर | बंद पडलेल्या शाळेच्या बसला सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांकरवी धक्का मारण्याचा प्रकार पाथर्डी फाटा परिसरात घडला. बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस फॅब्रिकेशनच्या दुकानावर जावून आदळली. या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
बुधवार ( दि. २३ ) रोजी साडेसात वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा भागातील दामोदर चौकात एका खाजगी शाळेच्या बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ही बस निखिल जाचक यांच्या मालकीच्या फॅब्रिकेशन दुकानावर जाऊन आदळली. बस बंद पडल्याने बसमधील विद्यार्थ्यांना खाली उतरायला सांगून त्यांना धक्का मारण्यास सांगितले होते. हा धक्कादायक प्रकार दुकानाचे मालक जाचक आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितला.
एम एच 15 ए के 1272 या बसचे दामोदर चौकात आल्यानंतर इंधन संपले. त्यामुळे बस चालकाने विद्यार्थ्यांना खाली उतरून बसला धक्का मारण्यास सांगितले. मात्र बस चे ब्रेक लागेनासे झाल्यामुळे ही बस मागे येऊ लागली .जवळच असलेल्या जिम मध्ये असलेल्या युवकांनी बाहेर धाव घेतली .पूर्ण ताकदीने त्यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला.बस चा वेग कमी झाला मात्र तरी देखील बस जाचक यांच्या फॅब्रिकेशन च्या दुकानावर जाऊन धडकली. त्यात दुकानाच्या शटर आदी बाबींचे नुकसान झाले .दरम्यान संतप्त पालकांनी बस चालका ला धारेवर धरले. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी नोंद घेतली आहे.