साठ वर्षांपूर्वीचे जुने झाड कोसळले

वाटसरू ठार; मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू

इगतपुरी : प्रतिनिधी
घोटी शहरात शुक्रवारी (दि. 4) सकाळी सुमारे साठ वर्षांंपूर्वीचे जुने झाड कोसळले. या झाडाखाली वाटसरू दबल्याने तो ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. शहरातील जुन्या आग्रा रोडवर ही घटना घडल्याने या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी होत होती.
घोटी शहर हे बाजारपेठेचे प्रमुख केंद्र असल्याने बाजारपेठेत सातत्याने वर्दळ असते. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घोटी येथे झाड कोसळल्याने रस्त्याने जाणारे नागरिक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने जाणारा कामगार झाडाखाली दबल्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बर्‍याच प्रयत्नानंतर त्या व्यक्तीस बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, स्थानिक रुग्णवाहिकाचालक तुकाराम चव्हाण यांनी तत्काळ त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच ही व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. सायंकाळपर्यत या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.
घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतुकीबाबत सूचना दिल्या. ग्रामपालिकेच्या कर्मचार्‍यांनी हे झाड रस्त्यावरून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *