बसपा अन् वंचित बहुजन आघाडी कुणाचे गणित बिघडवणार?
प्रमुख नगराध्यक्षपदाचे उमेदवार

रवींद्र घोडेस्वार

योगेश पाटील

प्रवीण नाईक
प्रवीण पगारे
डॉ. नितीन जाधव
मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत आता रंगत चढायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे योगेश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे प्रवीण नाईक, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र घोडेस्वार हे तिघे रिंगणात असले, तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. नितीन जाधव, तर बहुजन समाज पक्षातर्फे विधानसभा अध्यक्ष प्रवीण पगारे रिंगणात आहेत. लढत जरी तिरंगी दिसत असली, तरी वंचित आणि बसपाच्या उमेदवारीचा कुणाला फटका बसतो, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे. थेट नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते, हे निकालाच्या दिवशीच समजेल. विशेषतः बुद्धिस्ट आणि मुस्लिम मते कुणाकडे वळतील यावर सर्व निर्णय अवलंबून आहे.
आमदार सुहास कांदे यांनी थेट नगराध्यक्षसह 33 नगरसेवक निवडून आणायचे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत सांगितले. मात्र, आमदार कांदे यांचे अनेक शिलेदार उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. यामुळे 33 नगरसेवक निवडून आणणे आजतरी शक्य दिसत नाही. मुळात थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारीदेखील अगदी शेवटच्या क्षणी देण्यात आली. यामुळेदेखील अनेक दिग्गज नाराज झाले आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्ष लढाईदेखील सोपी नाही. त्यात भुजबळ विरुद्ध कांदे असा थेट सामनादेखील बघायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारेल, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. मुळात सुहास कांदे यांच्यासोबत अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक व भावी नगरसेवक होते. मात्र, त्यांनी अगदी मोजक्यांनाच उमेदवारी दिली. बाकीच्या लोकांना त्यांनी थेट गेटपास दिला. यामुळे अनेक जण नाराज आहेत. यातील अनेकांनी भुजबळ यांच्यासोबत जाऊन उमेदवारी मिळवली, तर काहींनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाऊन उमेदवारी मिळवली. मुळात उमेदवारी देताना कोणता निकष लावला, हे अद्याप समजले नाही. मनमाड तसेच नांदगाव तालुक्यात साडेतीन हजार कोटींचा विकास झाला, असे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले. मात्र, खरोखर विकास झाला का आणि विकास झाला तर तो कोणाचा झाला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरात अनेक रस्ते बनविण्यात आले. मात्र, अवघ्या दोन ते तीन महिन्यांत या रस्त्यांची चाळण झाली. याशिवाय अनेकांची नाराजी, जनतेचा रोष या सर्वांचा सामना सत्ताधारी शिंदे गटाला करायचा आहे. यात कळीचा मुद्दा म्हणजे, आमदार कांदे यांनी केवळ गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपाच्या वरिष्ठांसोबत युती करून, तसेच शहराध्यक्ष संदीप नरवडे, सचिन दराडे, जय
फुलवाणी, नितीन पांडे यांना हाताशी धरून धात्रकांसोबत आलेले इतर नगरसेवक व खुद्द भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपाला अवघ्या चार जागा देत त्यांची बोळवण केली, ज्या चार जागा दिल्या त्यांपैकी तीन जागांवर शिंदे गटाचे उमेदवार ए-बी फॉर्म घेऊन उभे आहेत. यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधात काम करण्याचे संकेत दिले आहेत. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भाजपाच्या पन्नास पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे देत आम्ही महायुतीचे काम करणार नाही, असे सांगितले.
थेट नगराध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवीण नाईक यांचा शहरातील गावठाण भागात चांगला जम आहे. याशिवाय शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व शिवसेनेला मानणारा वर्गही नाईक यांची जमेची बाजू असून, भाजपा व शिंदे गटाचे अनेक नाराज हे प्रवीण नाईक यांच्या संपर्कात असून, तीदेखील त्यांना मदत करू शकतात. यामुळे नाईक यांचेदेखील पारडे जड आहे. थेट नगराध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भीमसिंग घोडेस्वार असून, त्यांचा आंबेडकर चळवळीशी घनिष्ट संबंध आहे. याशिवाय घोडेस्वार हे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन या सर्वच अठरापगड जातींत चालणारे उमेदवार आहेेत. जातीच्या पलीकडे जाऊन घोडेस्वार यांना मनमाडकर साथ देत आहेत. मुळात घोडेस्वार यांची मनमाड शहरात सर्वांसाठी सुरू असलेली आरोग्यसेवा ही जगजाहीर आहे. याशिवाय ते इतर कामेदेखील करतात. यामुळे घोडेस्वार यांची बाजू जमेची आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. नितीन जाधव व बहुजन समाज पार्टीचे प्रवीण पगारे यांना पडणार्या मतांवर विजयी उमेदवाराचे गणित निर्भर आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने ते 30 पैकी 30 जागांवर उमेदवार दिले असून, हे उमेदवारदेखील तगडे आहेत. यामुळे नांदगावला जे घडले ते मनमाडला घडले नाही. बिनविरोध तर सोडा एकाही उमेदवाराच्या विरोधात दोनपेक्षा कमी उमेदवार उभे नाहीत, अनेक प्रभागांत तर काँटे की टक्कर होऊन धक्कादायक निकाल समोर येणार आहेत. मनमाड नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत होणार असली, तरी वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी यांच्या मतांवरच थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे वंचित व बसपा कोणाचे गणित बिघडवतात, हे येत्या 3 डिसेंबरलाच समजेल.