मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी स्पर्धा 

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज रिक्षा स्पर्धा

 

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नाशिक शहरातील हजारो रिक्षा चालकांनी या स्पर्धेत सहभागी नोंदविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (दि.9) वाढदिवस असल्याने यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये देखील विविध कार्यक्रमासह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात मुख्यमंत्री क्रिकेट चषक स्पर्धा तसेच रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी केले आहे.

 

यानिमित्ताने नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रिक्षाची आकर्षक सजावट, चालकाचा उत्तम पेहराव याची परीक्षकांकडून पाहणी करण्यात येणार आहे.

 

कोणत्याही राजकीय नेत्याचा, कार्यकर्त्यांचा वाढदिवस असला कि ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविले जात असल्याचं पाहायला मिळतं. कुठे प्रवेश सोहळा, कुठे अन्नदान, कुठे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीरासारखे कार्यक्रम आयोजिले जातात. परंतु नाशिक शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी स्पर्धा भरवण्यात येणार आहे. ही स्पर्धा कुठल्या क्रीडा स्पर्धा नसून रिक्षाच्या अनोख्या सजावटीची आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला एक लाख रुपयांचे विमा संरक्षणही मिळणार आहे. या स्पर्धेत प्रवेश निशुल्क असून, फक्त प्रवेशिका नोंदवणे आवश्यक आहे. दरम्यान अनोख्या रिक्षा सजावटीच्या स्पर्धेसाठी बक्षीसही ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याला 21 हजार, द्वितीय क्रमांकाला 11 हजार, तृतीय क्रमांकाला 7 हजार, चौथ्या क्रमांकाला 5 हजार आणि पाचवे बक्षीस 2 हजार रुपये असणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना मोफत 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आधार आणि पॅनकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त रिक्षा चालक मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. या  ऑटो रिक्षा सजावट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेक रिक्षा चालकांनी देखील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *