अधिकमासामुळे यंदा आठ श्रावणी सोमवार

19 वर्षांनंतर जुळून आला योग

नाशिक : प्रतिनिधी

श्रावणमासी हर्ष मानसी.. हिरवळ दाटे चोहीकडे असे श्रावणाचे वर्णन केले जाते. श्रावणमासाला धार्मिक अधिष्ठान लाभलेले असल्याने व्रतवैकल्याचा महिना म्हणूनही श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला अधिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करत उपवास केला जातो. यंदा मात्र अधिक तथा पुरुषोत्तम मासमुळे श्रावण महिना दोन महिन्यांचा असणार आहे. दरवर्षी श्रावणात चार ते पाच सोमवार येतात. मात्र, यंदा श्रावण महिन्यात 8 सोमवार आल्याने भाविकांकडून ‘बम बम भोले’चा गजर करत महादेवाची आराधना करण्यात येणार आहे. दि. 17 जुलै रोजी आषाढ अमावास्या असून, दि. 18 जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. पहिला श्रावणी सोमवार 22 जुलै रोजी असणार आहे तर शेवटचा श्रावण सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी असणार  आहे.हिंदू पंचांगानुसार यावेळी श्रावण महिना सुमारे 2 महिन्यांचा असणार आहे. श्रावण महिना 18 जुलै पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. 19 वर्षांनंतर हा योग आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी 18 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान अधिकमास असेल. त्यामुळे यंदा 4 ऐवजी 8 श्रावणी सोमवार  असतील.

पहिला सोमवार : 24 जुलै
दुसरा सोमवार : 31 जुलै
तिसरा सोमवार : 7 ऑगस्ट
चौथा सोमवार : 14 ऑगस्ट
पाचवा सोमवार : 21 ऑगस्ट
सहावा सोमवार : 28 ऑगस्ट
सातवा सोमवार : 4 सप्टेंबर
आठवा सोमवार : 11 सप्टेंबर

अधिकमासात दानधर्म, गंगेत स्नान करावे, परमेश्‍वराचे यज्ञ याग अधिष्ठान करावे. व्रतवैकल्य श्रावण मासात करावे.
– रवींद्र देव धर्माधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *