आनंदवलीतील जमीन प्रकरणात प्रतिथयश डॉक्टरची ६५ लाखांची फसवणूक

– ‘मोक्का’ च्या गुन्ह्यातील दोघांचा समावेश

नाशिक – विशेष प्रतिनिधी
आनंदवलीतील भू माफियांचा सहभाग असलेल्या टोळीने शहरातील प्रतिथयश डॉक्टरला जमीन व्यवहारात तब्बल ६५ लाखांना गंडवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील दोघेजण आनंदवलीतील बहुचर्चित खून व मोक्का प्रकरणातील आरोपी असल्याने भू माफियांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०१५ ते अॉक्टोबर २०२१ दरम्यान ही घटना घडली आहे.
अरूण भागवत पाटील, जगदीश कारभारी गावंड, (वय ५१, रा. अंबड), सोमनाथ काशिनाथ मंडलीक (वय ५१, रा. दत्त मंगल अपार्टमेंट, आनंदवली), दत्तात्रय काशिनाथ मंडलिक, (वय ५०, रा. चेहडी नाका, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे असून यातील अरूण पाटील हे मध्यस्थ होते. ते मयत झाले आहेत.
सुयश हॉस्पिटलचे प्रतिथयश डॉ. प्रशांत वसंतराव पाटील (वय ५५, रा. प्रकृती बंगला, उंटवाड़ी जिमखाना जवळ, कर्मयोगी नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करुन कट कारस्थान रचले. डॉ. पाटील व त्यांचे भागीदार यांच्याशी मौजे आनंदवली शिवारातील जमीन मालकीची असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. या जमिनीचा व्यवहार करून डॉ. पाटील यांच्या लाभात नोटरी, साठेखत करारनामा व भरणा पावती करून डॉ. प्रशांत पाटील व त्यांचे साथीदार यांच्याकडून टप्याटप्याने एकूण पासष्ट लाख रूपये रोखीने, आरटीजीएस व चेकद्वारे घेवून या रक्कमेचा अपहार करत फसवणूक केली.
या तक्रारीन्वये गंगापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कायदा कलम ४२० (ठकवणूक करणे), ४०६ (फौजदारी पात्र न्यासभंग), १२० बन (गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे), ३४ (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाने केलेली कृती) अन्वये गुन्हा नोंदवला असून सहायक निरीक्षक पवार तपास करत आहेत.
—————————————————-

‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग

अज्ञात अथवा किरकोळ वादातून हत्या झाल्याचे भासवत आनंदवलीतील मोक्याचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीने रमेश मंडलिक (७२) या वृद्ध जमीन मालकाची हत्या घडवून आणली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्वतः या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे हलवून ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारांसह टोळीला अटक केली होती. या गुन्ह्याला ‘मोक्का’ लावण्यात आला असून यातील काहीही आरोपी आजही मध्यवर्ती कारागृहात आहेत.
याच टोळीतील दोघा गुन्हेगारांनी डॉ. प्रशांत पाटील यांना ६५ लाखांना गंडवले आहे. याशिवाय या टोळीने आणखीन किती जणांना गंडवले याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *