साधू महंतांचे रामकुंडावर आंदोलन
पंचवटी : वार्ताहर
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा धाक केवळ हिंदू साधू महंत यांनाच दाखवला जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अंनिस कायदा रद्द करावा. या मागणीसाठी शहरातील साधू-महंत यांनी सोमवारी (दि.23) दुपारी दोन वाजता रामकुंडावर आंदोलन केले.
या आंदोलनांप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करण्यात आला. यावेळी त्रंबकेश्वर येथील जुना आखाड्याचे महंत हर्षदभारती, महंत सुधीरदास पुजारी, अनिकेतशास्त्री देशपांडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, काळाराम मंदिर विश्वस्त धनंजय पुजारी, हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी, लव जिहाद संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष गजू घोडके उपस्थित होते. अंनिस कायदा केवळ हिंदू धर्मातील साधू महंत यांच्यावरच लागू होताना दिसून येत आहे. परंतु मौलाना, पाद्री, भन्ते आदी जादूटोणा करत असताना, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे सरकारने अंनिस समिती बरखास्त करावी. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यात यावा. यापुढे असा पाखंडीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
51 लाखांचा धनादेश
मौलाना, पाद्री, भन्ते जे दैवी शक्ती असल्याचा दावा करतात व भाविक भक्तांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. तसेच त्यांच्या भोळेपणाचा व भावनिक मनोवृत्तीचा गैरफायदा घेतात. मौलाना, पाद्री, भन्ते यांनी आपली दैवी शक्ती सिद्ध करावी आणि 51 लाख रुपयांचा धनादेश घेऊन जाण्याचे खुले आव्हान अनिकेतशास्त्री यांनी यावेळी केले.