श्रद्धेचा गैरवापर, क्रौर्याचा कळस : नाशिकमध्ये घोड्यांवर अत्याचार

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंधश्रद्धेच्या आड लपलेली क्रूरता आणि माणुसकीचा र्‍हास नाशिक शहरात उघडपणे सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नशीब, समृद्धी आणि संकटमुक्तीच्या नावाखाली काळ्या रंगाच्या घोड्याच्या नालेला फार महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन घोडेमालकाने एका घोड्याला चक्क काळ्या रंगाचा डाय लावून पैसे कमावण्यासाठी त्याचा रंग बदलून घोड्याच्या पायांना वारंवार खिळे ठोकून लोखंडी नाल काढण्याचा अमानुष प्रकार सुरू असून, हा केवळ प्राण्यांवरील अत्याचार नसून, समाजाच्या विवेकावर झालेला थेट आघात आहे.

घोड्यांचे पालनपोषण करण्याचा दिखावा करणारे काही घोडेमालक आणि चालक या छळाला व्यवसायाचे स्वरूप देत आहेत. अंधश्रद्धेचा बाजार मांडत नागरिकांच्या भीती, श्रद्धा आणि अज्ञानाचा निर्लज्जपणे वापर केला जात आहे. एका नालासाठी शेकडो रुपये मोजणारे नागरिक आपले दुर्दैव दूर होईल या भ्रमात असताना, प्रत्यक्षात त्याची किंमत मुक्या प्राण्यांना रक्त, वेदना आणि जखमांच्या रूपाने चुकवावी लागत आहे. शहरात घोडेमालक अशा प्रकारे 10 ते 15 घोडे शहरातील विविध भागात फिरवत घोड्याची नाल विकण्याचा प्रयत्न दिवसाढवळ्या सुरू असल्याचे मंगलरूप गोशाळेचे गोसेवक पुरुषोत्तम आव्हाड यांच्या लक्षात येताच त्यांनी घोडेमालकाकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली तर घोड्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे यावेळी दिसून आले. वास्तविक पाहता, घोड्याला उपचारासाठी पशू दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे असताना हे घोडेमालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या प्रकारामुळे घोड्यांच्या पायांवर गंभीर जखमा, सूज आणि संसर्ग निर्माण होत असून, त्यांच्या हालचालींवरही परिणाम होत आहे. हा छळ उघड्या डोळ्यांनी दिसत असताना प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित यंत्रणांचे मौन अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे.
कायदे अस्तित्वात असतानाही अशा अमानवी प्रथा खुलेआम सुरू आहेत, यावरून अंमलबजावणीतील हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो.
मंगळरूप गोशाळा व प्राणिमित्र संघटनांसह अश्वप्रेमींनी पुढाकार घेत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली, तरी केवळ तक्रारीपुरते मर्यादित न राहता ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई, घोड्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी आणि या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घालणे ही काळाची गरज आहे.
अंधश्रद्धा फोफावते तेव्हा क्रौर्याला मोकळे रान मिळते. समाजानेही अशा गैरसमजांना खतपाणी घालणे थांबवले पाहिजे. अन्यथा श्रद्धेच्या नावाखाली होणारा हा छळ उद्या आणखी भयावह रूप धारण करण्यास वेळ लागणार नाही.

Abuse of trust, the height of cruelty: Torture of horses in Nashik

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *