अभाविप अधिवेशनाने युवा पिढीमध्ये उत्साह अन् जल्लोष

मुकुंद बाविस्कर
अभाविपचे हीरक महोत्सवी (साठावे) अधिवेशन नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर अत्यंत उत्साही वातावरणात झाले. या अधिवेशनात युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या अधिवेशनामुळे युवकांमध्ये उत्साहपूर्ण आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या अधिवेशनादरम्यान शहरातून पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांची भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत विविध थोर स्त्री- पुरुषांची वेशभूषा केलेले तरुण-तरुणी सहभागी झाले होते. अधिवेशनाचे उद्घाटन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. मंत्री महाजन म्हणाले की, देशाला महासत्ता करण्याचे आणि विकसित भारत घडविण्याचे स्वप्न साकार करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ शिक्षण देणारी नव्हे, तर राष्ट्रभक्त, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार नागरिक घडवणारी संघटना म्हणून अभाविप देशभर कार्यरत आहे. ही केवळ एक संघटना नसून राष्ट्र प्रथम हा विचार जोपासणारी चळवळ आहे, असेही ते म्हणाले. स्वामी जितेंद्रनाथ महाराज व अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बागेवाडी यांनीही विचार मांडले.

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे मंथन :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे आजच्या पिढीला नव्याने दर्शन घडविणारी मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे ही दुर्मिळ पुस्तिका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेत सावित्रीबाई फुले यांची उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने व कर्ज या विषयांवरील पाच महत्त्वाची भाषणे समाविष्ट आहेत. विद्यापीठाच्या यश इन सभागृहात हा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या आद्यगुरू असून, समाजातील विषमता, अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी उभा केलेला लढा आजही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सावित्रीबाईंची भाषणे हा ऐतिहासिक दस्तऐवज नसून आजच्या सामाजिक आणि शैक्षणिक वास्तवाला दिशा देणारी असल्याचे नमूद केले. कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, सावित्रीबाई फुले अध्यासन प्रमुख डॉ. रामदास भोग, कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. संजीवनी महाले, विलास बधान आदी उपस्थित होते.

अष्टौप्रहर स्वरहोत्राने रसिक मंत्रमुग्ध :
शास्त्रीय संगीतातील विविध रागांची अदाकारी अन् सोबतीला तितक्याच समर्थ साथसंगतीमुळे शंकराचार्य न्यासच्या बालाजी मंदिर प्रांगणात ग्रंथ तुमच्या दारीतर्फे सादर अष्टौप्रहर स्वरहोत्राने निसर्गरम्य परिसर भारावून टाकला होता. विविधांगी कलाविष्कारांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या संकल्पातून अष्टौप्रहर स्वरहोत्राने अखंडित सेवेस प्रारंभ झाला होता. भारतीय कालगणनेनुसार दिवसांतील एकूण 24 तासांचे आठ प्रहर व दहा थाट मानले जातात. यात दिवसाचे चार आणि रात्रीचे चार असे एकूण आठ प्रहर आहेत. कलाविष्कारांच्या या पुष्पयात्रेत महिलांनी सहभाग घेतला. पंचवटीतील काळाराम मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी एकत्र येऊन तेथून दुचाकीद्वारे मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, काँग्रेस भवन, अशोक स्तंभमार्गे रॅली काढण्यात आली. या उपक्रमाच्या संकल्पात अखंड चोवीस तास संगीतसेवा व गायन-वादनाची पर्वणी झाली. गरिमा नृत्यनाद संस्थेच्या गरिमा चव्हाण व विद्यार्थिनींनी भरतनाट्यम सादर केले. दिवसभर विविध संगीतसेवेसोबतच विविध कलांचेही सादरीकरण झाले.

पोलिसांच्या शस्त्रांंचे प्रदर्शन :
शहरात महत्त्वाच्या बंदोबस्तासह गस्तीवेळी तैनात असलेल्या पोलिसांकडील रिव्हॉल्व्हरपासून तर अगदी अत्याधुनिक शस्त्रांंपर्यंत सर्व हत्यारे जवळून पाहण्याची व जाणून घेण्याची संधी नाशिककरांना मिळाली. पोलिसांच्या शस्त्रांचे प्रदर्शन शहरात साजर्‍या होत असलेल्या पोलिस रेझिंग सप्ताहांंतर्गत सिटी सेंटर मॉल येथे आयोजित करण्यात आले होते. बॉम्बशोधक व नाशक पथकाची कार्यपद्धती समजून घेण्यासह जलद प्रतिसाद पथकातील कमांडोसोबतचे क्षण टिपण्यातही चिमुकल्यांसह तरुणाईची रीघ दिसली. विविध मुद्यांभोवती कार्यरत प्रभावी पोलिसिंग जाणून घेत नाशिककरांनी सलाम केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रदर्शनात सर्व शस्त्रे, अद्ययावत वाहने व विविध विभागांची माहिती नाशिककरांना देण्यात आली. त्यात पिस्तुलापासून एके-47 व इतर आधुनिक शस्त्रांची मांडणी करण्यात आली. नागरिकांनी शस्त्र न्याहाळताना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.

नानासाहेब बोरस्ते यांच्या पुस्तकांचे प्रकाशन :
माजी आमदार आणि ज्येष्ठ साहित्यिक नानासाहेब बोरस्ते यांनी आपल्या दोन्ही काव्यसंग्रहांतून वैविध्यपूर्ण आशय मांडला आहे. या कवितांना तत्त्वज्ञानाचे भक्कम अधिष्ठान असून, त्या शब्दबंबाळ नसून साध्या-सोप्या शब्दांतून जगण्यावर संयत भाष्य करतात, असे प्रतिपादन सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी केले. लेखक नानासाहेब बोरस्ते यांच्या आनंदाचे ठायी काव्यसंग्रह आणि या नाना-तरंग या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निमंत्रितांच्या काव्यसंध्या प्रयोगाचा चौथा भाग सादर करण्यात आला. गीतकार मिलिंद गांधी, प्रा. डॉ. गणेश मोगल, दत्ता सोनवणे, अशोक पाटील आणि प्रा. डॉ. अंजना भंडारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
राज्य बालनाट्य स्पर्धेला प्रारंभ :
लहान मुलांना अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्याचे काम त्यांच्याकडून अविरत सुरू असते. एका व्यक्तीने उत्तर न दिल्यास दुसर्‍या व्यक्तीला प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते. भुते खरीच अस्तित्वात आहेत का?, भूतकाळ आपल्याशी बोलू लागला तर? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम छोट्यांनी बालनाट्यातून केले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 22 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा प्रारंभ परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाला. पहिल्या दिवशी पाच नाटके सादर झाली. ज्येष्ठ रंगकर्मी विवेक गरुड, अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, बालरंगभूमी परिषदेच्या नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह कृतार्थ कन्सारा उपस्थित होते. स्पर्धा समन्वयक राजेश जाधव यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची रूपरेषा आधोरेखित केली. संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले.

ABVP convention creates enthusiasm and joy among the youth generation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *