पन्नास हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यास अटक

नाशिक:   येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मारहाण करणार नाही, तसेच कलम वाढवण्याची भीती दाखवून 50 हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलीस शिपाई सतीश बागुल यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
येथील एका तरुणाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सपकाळे हे महिन्यापूर्वीच येथे रुजू झाले होते.
तक्रारदार यांच्या भावाच्या नावावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्ह्यात भावाला पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करणार नाही, तसेच या गुन्ह्यात 307 वाढीव कलम लावण्याची भीती घालून सपकाळे व बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
श्री.सपकाळे यांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन त्यांचा जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेतला. सपकाळे यांनी तक्रारदार यांच्या मोबाईलमधील मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
याबाबत पथकाने पडतळणी करुन सपकाळे व पोलीस शिपाई बागुल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक विश्वजीत जाधव, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे,नितिन कराड, परसराम जाधव यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *