35 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
विल्होळी पोलीस चौकी येथे जमा करून घेतलेला ट्रक सोडण्यासाठी ३५ हजार रुपयाची लाच प्रकरणात पोलिस हवालदार रविंद्र बाळासाहेब मल्ले व खासगी इसम तरुण मोहन तोडी यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार यांचा विल्होळी पोलीस चौकी येथे जमा करून घेतलेला ट्रक सोडण्यासाठी पोलिस हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले याने एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता रवींद्र बाळासाहेब मल्ले, पोलीस हवालदार (नेमणूक तालुका पो. ठाणे, नाशिक ग्रामिण) यांनी तक्रारदार यांचे कडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली व तडजोडअंती ७० हजार लाचेची मागणी करून पहिला हफ्ता ३५ हजार रुपये रक्कम खासगी इसम तरुण मोहन तोंडी, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. पंचवटी नाशिक यांचेकडे देण्यास सांगितले. ६ नोव्हेंबर रोजी तरुण मोहन तोंडी यांनी ३५ हजार रुपये लाचेची रक्कम ओम नागपुर ट्रान्सपोर्ट, हिरावाडी, नाशिक येथे स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर दोघांविरुध्द पंचवटी पोलीस ठाणे, येथे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.