नाशकात एसीबीची सर्वांत मोठी कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात लाचखोरी थांबण्याचा नाव घेत नसून, काल तब्बल वीस लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सिन्नर येथील खासगी सावकारावर सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात तब्बल २० लाखांची लाच स्वीकारताना निबंधक कार्यालयातील सहाय्यक तालुका निबंधक रणजित महादेव पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मुंबई नाका परिसरात झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे निबंधक कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. पाटील हे निफाड येथे सहाय्यक तालुका निबंध म्हणून पदभार आहे अजून सिन्नरचाही पदभार त्यांच्याकडे आहे. यापूर्वी सिन्नर येथील तालुका निबंधकही जाळ्यात सापडल्याची चर्चा आहे. सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचा मोबदल्यात पाटील यांनी सिन्नरच्या एका खासगी सावकाराकडे छापा टाकला असता, कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे २० लाखांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री लाच घेताना त्यांना मुंबई नाका परिसरात रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती ‘एसीबी’ ने दिली. नाशिक शहरात काही महिन्यांपूर्वी खासगी सावकाराच्याच जाचाला कंटाळून पाथर्डी फाटा येथील पती पत्नीने तर सातपूरच्या अशोकनगर भागात पित्यासह दोन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. सहकार खात्याकडे खासगी सावकारांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे या दोन घटनांनंतर सहकार विभागाने खासगी सावकारी करणार्यांविरोधात मोहीम उघडली होती. आता या मोहिमेअंतर्गतच कारवाई न करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहाय्यक निबंधक व वरिष्ठ लिपीक जाळ्यात अडकले आहेत.याबाबत अधिक तपास सुरू आहे.