नाशिक : प्रतिनिधी
पाच लाखांच्या लाचेची मागणी करुन चार लाख रुपये स्वीकारताना बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. चाळीसगाव येथील ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते असे या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेच्या माध्यमातून बांधकाम विभाग चाळीसगाव जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत पातोंडा येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाची 4 कोटी 82 लाख रुपये बिल काढून देण्याच्या मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरिक्त सुरक्षा रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. चार लाख रुपये स्वीकारतानाच पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस नाइक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, अविनाश पवार, पोलीस नाइक सुरेश चव्हाण यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचला.