रिंगरोडसाठी 3,954 कोटींची मंजुरी
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात आली असून, नाशिक रिंगरोडच्या 69.15 किमी लांबीच्या बांधकामासाठी 3,954 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली होती. आता बांधकामासाठी स्वतंत्र मंजुरी देण्यात आली असून, सिंहस्थाच्या तयारीसाठी विविध पायाभूत, तीर्थक्षेत्र आणि वाहतूक प्रकल्पांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.
नाशिक रिंगरोड प्रकल्प एनएच-60 वरील डीआरडीओ जंक्शनपासून सुरू होऊन शहराला वलय देत पुन्हा त्याच मार्गाला जोडला जाणार आहे. प्रस्तावित चार ते सहा लेनच्या या मार्गात पाच मोठे पूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ वाहन अंडरपास तसेच सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा रस्ता चार राष्ट्रीय महामार्ग आणि चार राज्य महामार्गांना जोडणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सिंहस्थ काळात भाविकांची वाढलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
या बैठकीत रिंगरोडव्यतिरिक्त सुमारे 170 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि तीर्थक्षेत्र विकासकामांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
बैठकीस नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांना कामांची निविदा प्रक्रिया व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सिंहस्थ 2027 पूर्वी सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन आणि समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिंगरोड प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण लांबी : 69.15 किमी
अंदाजित खर्च : 3,954 कोटी रुपये
मार्ग : डीआरडीओ जंक्शन(एनएच-60)पासून शहराला वलय देत पुन्हा त्याच मार्गाला जोडणार
चार ते सहा लेनचा प्रस्तावित मार्ग
पाच मोठे पूल व दोन रेल्वे उड्डाणपूल
आठ वाहन अंडरपास व सेवा रस्ते
चार राष्ट्रीय महामार्ग व चार राज्य महामार्गांना जोडणी
सिंहस्थासाठी मंजूर प्रमुख विकासकामे
रामकुंड व कुशावर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारणी- 7.09 कोटी रुपये
ब्रह्मगिरी परिसरातील प्रदक्षिणा मार्ग व अंजनेरी येथे पर्यटन विकास- 23.12 कोटी रुपये
टाकळी येथे गोदावरी नदी-नंदिनी नदी संगमावर घाट बांधकाम- 44.53 कोटी रुपये
पंचवटी परिसरात कर्मा हाइट्स ते नांदूर गाव रस्ता विकास- 20.22 कोटी रुपये
एकात्मिक वाहतूक आराखडा (आयआयएम नागपूरमार्फत) 10.24 कोटी रुपये
त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय सुधारणा – 1.72 कोटी रुपये
कावनई (कपिलधारा तीर्थ) विकासकामे – 27.47 कोटी रुपये
चक्रतीर्थ (चाकोरेबेझे परिसर) विकास – 24.10 कोटी रुपये
टाकेद येथील पायाभूत सुविधा विकास – 21.91 कोटी रुपये
Acceleration of infrastructure work for Simhastha
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…