पिंपळगाव पालिकेचे पहिलेच अंदाजपत्रक 99.52 कोटींचे मंजूर
पिंपळगाव ब. : प्रतिनिधी
पिंपळगाव नगरपरिषदेचे पहिले अंदाजपत्रक (2026-27) नुकतेच सादर झाले. नगराध्यक्ष डॉ. मनोज बरडे यांनी तब्बल 99 कोटी 52 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. पहिल्या अंदाजपत्रकात पिंपळगावच्या विकासकामांना गती देण्यासाठी व पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत.
पिंपळगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष डॉ. बरडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रक मंजुरीबाबत विशेष सभा पार पडली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सतीश मोरे, मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके, शिवसेनेचे गटनेते नीलेश पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते गणेश बनकर आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष बरडे यांनी 99 कोटी 52 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना स्वच्छ भारत अभियानासाठी 12 कोटी रुपये, व्यापारी संकुले, नाट्यगृहे, क्रीडांगण, सांडपाणी, नियोजन आदी कामांसाठी 15 कोटी रुपये, अल्पसंख्याक निधी सात कोटी, नगरोत्थान निधी- सात कोटी, घनकचरा व्यवस्थापन चार कोटी रुपये अशी अंदाजित तरतूद
केली आहे.
घनकचर्याची संपूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी सात कोटींची तरतूद केली आहे. यासह दैनंदिन पाणीपुरवठा, रस्ते, विकासकामे, आरोग्य व स्वच्छता, पर्यटनवाढ या बाबींचाही समावेश असलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
घरपट्टी, पाणीपट्टीसह करवसुलीवर भर देण्यात येणार आहे. यांसह उत्पन्नवाढीबाबत विचारविनिमय करण्यात आला. गटनेते गणेश बनकर यांनी अंदाजपत्रकात अंशतः बदल सुचविले. याप्रसंगी नगरसेवक छाया पाटील, रेखा लभडे, सुजित मोरे, भास्कर बनकर, प्रशांत मोरे, श्वेता मोरे, राहुल बनकर, इमरान कोतवाल, तौसिफ मन्सुरी, अशोक दळवी, भाऊसाहेब आहिरे, रामकृष्ण खोडे, नरेंद्र सैंदाणे, माणिक वाघ, ज्ञानेश्वर जोगारे, सोनाली विधाते, शीतल मोरे, सिंधू, गांगुर्डे, सीमा कायस्थ, सुवर्णा वाघले, सोनाली जाधव, अनिता गांगुर्डे, मेघना पानपाटील, अलका वारडे आदी
उपस्थित होते.
Acceleration of various development works including infrastructure