पैशांची मागणी; नागरगोजेंची पोलिसांत धाव
नाशिक : गोरख काळे
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने सोशल मीडियावर पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता पुन्हा असाच प्रकार समोर आला असून, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करत ओळखीच्या व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच डॉ. नागरगोजे यांनी अकाउंट बंद केले आहे.
ज्या प्रकारे डिजिटल पद्धतीने व्यवहार केले जात आहेत. आता यामध्ये फसवणुकीचे प्रकारदेखील होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार कुठे ना कुठे होत आहेत. फेसबुक, व्हॉट्सऍप तसेच इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, यातील संशयित पोलिसांच्या देखील हाती येत नाहीत. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांचे इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करणार्या संशयिताने नंदुरबार येथील त्यांच्या मित्राकडे पैशाची मागणी केली. हा प्रकार नागरगोजे यांच्या मित्राच्या लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण अशा प्रकारे पैशाची मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अकाउंट हॅक झाल्याचे डॉ. नागरगोजे यांच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ त्यांनी हे अकाउंट बंद केले. दरम्यान, या प्रकारातून महापालिका अधिकार्यांच्या खात्यावर अनेकांची नजर असल्याचे दिसून येत
आहे.