मुंबई :
दुबार मतदार नोंदणीवरून आरोप-प्रत्यारोपांचे बाण सध्या सुरू आहेत. मविआ आणि मनसेच्या मोर्चानंतर काल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव आणि राज ठाकरे यांना फक्त हिंदू आणि मराठीच दुबार नावे दिसली. राज ठाकरेंनी जे मतदारसंघ सांगितले त्यामध्ये केवळ त्यांना भोईर, पाटील अशीच आडनावे दिसून आली. दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? बडवायची भाषा मराठी, दलित आणि हिंदू मतदारांसाठी वापरत आहात. दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्याय का? उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे, असे म्हणत आशिष शेलार यांनी टीका केली.
नाना पटोले, रोहित पवारांचा राजीनामा मागणार का?
ही दुबार नावे नसती तर तुमचा निकाल काय लागला असता? असा सवाल शेलार यांनी महाविकास आघाडीबरोबरच राज ठाकरेंना विचारला. अजून पुरावे हवे असतील तर देतो. मतदारसंघ व मतदारांची नावे राज ठाकरे तुम्ही घेतली. मी उत्तर देतो. रोहित पवार निवडून आले त्या मतदारसंघात पाच हजार मतदार हे मुस्लिम दुबार आहेत. नाना पटोले साकोलीतून निवडून आले. 208 मतांनी. त्याच मतदारसंघात 400 हून अधिक मुस्लिम दुबार मतदार आहेत. त्यांचा राजीनामा मागणार का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
दुबार मतदार नावे प्रिंटिंग मिस्टेक
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची कबुली
नाशिक : प्रतिनिधी
मतदारयादीत आढळणार्या दुबार नावांचा प्रकार हा प्रिंटिंग मिस्टेकमुळे झालेला असण्याची शक्यता असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आम्ही स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दुबार मतदारांची पडताळणी करून ती नावे वगळावीत, अशी आमचीही मागणी आहे, असे ते म्हणाले.
सोमवारी (दि. 3) विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिक दौर्यावर आलेल्या महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. जिल्ह्यात दिंडोरी आणि सिन्नर येथे होत असलेल्या नव्या प्रवेशांमुळे स्थानिक स्तरावर महायुती अधिक मजबूत होत असल्याचे सांगून त्यांनी, ‘महायुती म्हणून आम्ही एकत्रच लढणार आहोत. ज्या ठिकाणी युती शक्य नाही, तिथेही मैत्रीपूर्ण लढत देण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ असे स्पष्ट केले.
दुबार नावे असल्याचे शेलारांनी मान्य केले : उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगाची भुताटकी
मुंबई :
मतदाराचे ओळख केंद्र आम्ही शाखेत सुरू करणार आहोत. सक्षम अॅप आणि निवडणूक आयोग सर्व्हर हे आयोग हाताळत नाही, असा संशय आम्हाला आहे. कोणीतरी माझ्या नावाने अॅपमध्ये रजिस्टर केले आणि मग ओटीपी आला असणार, ज्यातून माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाव वगळले गेले असते. आम्ही मतदारांना सांगतो, तुम्ही शाखेमध्ये या. तुमच्या नावात गोंधळ नाही ना? तुमची नावे तपासून घ्या. ही सगळी निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. त्यामुळे दुसरे कोणी मतदार तुमच्या पत्त्यावर असतील तर ते निदर्शनास आणून द्या. सरकार झेन-जीला घाबरतंय. आम्ही सांगतोय निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
शेतकर्यांचा खरीप हंगाम गेला. आम्ही मोर्चा काढला होता, आमची मागणी होती की, शेतकर्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आत्ता केंद्राचे पथक तीन दिवस पाहणी करणार आहे. आता पाहणी करणार कधी आणि प्रस्ताव देणार कधी? शेतकर्यांचे पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार तर आताचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. महात्मा फुले कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, कारण डेटा तसाच आहे. आमच्याकडे कुठलीही समिती नव्हती. दिवाळी आधी पैसे शेतकर्यांना मिळतील, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोकळ आश्वासन दिले होते. आत्ता ते मिळाले की नाही ते बघू, असेही ठाकरे म्हणाले.
शेलार यांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं
दरम्यान, पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे. मतचोरीचा मुद्दा ते मानतच नव्हते. त्याच्यामुळे आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू बोलायचं धाडस दाखवले. हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम असेल. देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचार करुन आल्यानंतरच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलारांनी सिद्ध केलंय की, मतदारयादीत गोंधळ आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.