गुन्हे शाखा युनिट-2 ची यशस्वी कामगिरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगून आयुक्तालय हद्दीतील विविध ठिकाणी दहशत माजविणार्या इसमांवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 2च्या पथकाने धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्या एका आरोपीला धारदार शस्त्रासह ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
या अनुषंगाने दि. 21 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट-2 कडील अधिकारी व अंमलदार हे अशा व्यक्तींचा शोध घेत असताना पोहवा नितीन फुलमाळी यांना गोपनीय माहिती मिळाली. माहितीप्रमाणे, गोरेवाडी रेल्वे ट्रॅक्शनकडे जाणार्या रस्त्यावर, जुन्या रेल्वे ट्रॅकजवळ, मनपा व्यायामशाळेजवळ एक इसम धारदार तलवार घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले.
ही माहिती प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ मार्गदर्शन करून पथक रवाना केले. या पथकात सपोउनि शंकर काळे, प्रेमचंद गांगुर्डे, पोहवा मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण व पोअंम प्रवीण वानखेडे हे सहभागी होते. सदर ठिकाणी सापळा लावून दिलेल्या वर्णनानुसार एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन नाव विचारता त्याने आपले नाव सुमित किशोर चंडालिया (वय 24, रा. साईनाथनगर, गोरेवाडीजवळ, ट्रॅक्शन रोड, नाशिकरोड) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये किमतीची धारदार तलवार आढळून आली. ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. पोहवा नितीन फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस व जप्त शस्त्रास नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट -2 चे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, सपोउनि शंकर काळे, प्रेमचंद गांगुर्डे, पोहवा मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, पोअंम प्रवीण वानखेडे व चापोअं जितेंद्र वजीरे यांनी केली.