दादा, भाऊ, मामा नंबरप्लेट लावणार्‍यांवर कारवाई

आरटीओकडून पंधरा दिवसांत चार लाखांचा दंड वसूल

पंचवटी : वार्ताहर
फॅन्सी व अनधिकृत नंबरप्लेट्स आणि काळ्या फिल्मस् बसविलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. काका, मामा, दादा अशा प्रकारे फॅन्सी नंबरप्लेट लावणार्‍यांच्या विरोधात 28 मे ते 10 जूनदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी 563 वाहनचालकांकडून सुमारे 4 लाख 29 हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी दिली.
अनेक हौशी वाहनमालक वाहन घेताना आकर्षक नंबरसाठी लाखो रुपये खर्च करतात. पण, त्या आकर्षक नंबरच्या माध्यमातून काका, मामा, दादा अशा प्रकारे फॅन्सी पद्धतीने नोंदणी क्रमांक वाहनावर टाकतात. अशा प्रकारे आकर्षक नंबरप्लेट लावणे विना नंबरप्लेट वाहन चालविणे तसेच काळ्या फिल्मस् काचेवर बसवून चालवणे हा गुन्हा आहे. या वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. अशा वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान दोषी आढळून आलेल्या एकूण 563 वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर चुकीच्या पद्धतीने लावलेल्या फॅन्सी नंबरप्लेट व वाहनांच्या काचेवरील काळ्या फिल्मस् काढून घ्याव्यात. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही, असे राजश्री गुंड यांनी सांगितले.

28 जूनपासून मोहीम

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनचालकांनी वाहनाला नियमानुसार नंबरप्लेट बनविणे गरजेचे आहे. भाऊ, दादा, काका, मामा अशा नंबरप्लेट्स आणि वाहनांना काळ्या फिल्म लावून चालविणार्‍यांच्या 28 जूनपासून 13 जुलैपर्यंत प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्तिक मोहीम तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड
यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *