नाशिक : गोरख काळे
नाशिक महानगरपालिका निवडणुका सप्टेबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाकडून निवडणुकांचे कामे सुरु आहेत. दरम्यान महापालिकेतील एकूण 44 प्रभागासाठी सुमारे 11 उपजिल्हाधिकारी दर्जाचे निवडणूक निर्णय अधिकारी लागण्याची शक्याता आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी बुधवारी (दि.6) विशेष आदेश देत राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकार्यांना सूचनांची यादी रवाना केली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दहा ते पंधरा प्रभागांकरिता एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे तर राज्यातील इतर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता चार ते पाच प्रभागांकरिता एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महापालिका आयुक्त हे उपजिल्हाधिकारी पदाच्या दर्जा पेक्षा कमी नाही अशा अधिकार्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी त्या जिल्ह्याच्या स्थानिक रहिवासी नसावा तसेच तो अधिकारी मागील तीन वर्षापासून एकाच पदावर कार्यरत नसावा व तो संबंधित जिल्ह्यातील मागील चार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून नियुक्त नसावा, असे आदेश देण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त निवडणूक आचारसंहितेची संबंधित सर्व कामकाज हाताळण्यासाठी आचारसंहिता पक्ष स्थापन करतील, असे आदेशात म्हटले आहे तसेच कक्षाच्या प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील एक अधिकारी नियुक्ती करतील. तसेच उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा हिशोब तपासण्यात एक कक्ष तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षण तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका निवडणूक कधी होणार हे नक्की नसले तरी प्रशासकीय पातळीवर तसेच निवडणूक आयोगाकडून सर्व प्रकारची कामे करण्यात येत आहे. सध्या मतदार यादी वरील हरकतींचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे तर निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना आदेश देऊन मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी चार ते पाच प्रभागांकरिता एक निर्णय अधिकारी याप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.