बालकाच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास
नाशिक / त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
अंजनेरी शिवारातील आधारतीर्थ अनाथालयात चार वर्षाच्या बालकाच्या खूनानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या आधारतीर्थाला परवानगीच नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे इतके दिवस आधारतीर्थ नेमके कुणाच्या आधारावर चालत होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, बालकाच्या खूनप्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. 132 मुला-मुलींचा जबाब नोंदविण्याचे अवघड काम यंत्रणेपुढे आहे. त्यासाठी महिला पोलिसांची मदत घेतली जात आहे. आलोक शिंगारे याचा गळा दाबून खून झाल्याचा अहवाल शवविच्छेदनात आला आहे. त्यामुळे या मुलाचा खून कोणी व कशासाठी केला? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
काल सकाळपासून पोलीस जबाब घेत होते. मयत आलोकची आईची शेजारीण असलेली आजी येथे थांबून आहे. तिचा नातू देखील याच आश्रमात दाखल आहे. तिच्या ओळखीवर धुणे भांडे करणा-या आलोकच्या आईने आपल्या दोन मुलांना येथे दाखल केले होते. बुधवारी शासकीय यंत्रणांचे अधिकारी येथे भेट देण्यास येत होते.
सकाळी महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी भेट दिली. त्यांच्या या भेटीत येथील अनाथालय बालकल्याण विभागाची परवानगी न घेता सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नाशिक महिला व बालकल्याण समितीच्या पथकाने येथे भेट दिली.त्यांनी देखील अशा प्रकारे अनाथलय कसे सुरू आहे? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती महिला व बालकल्याण विभागाने देखील या अनाथालयाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. येथे असलेल्या बालकांची माहिती घेणे अनिवार्य असून शेकडयाच्या संख्येने बालके असतांना त्यांचे लसीकरण कुपोषण याबाबत अनभिज्ञता दिसून येत आहे. येथे पौगंडावस्थेतील मुले आणि मुली आहेत त्यांच्याबाबत देखील समुपदेशन करणे आवश्यक आहे.
व्यवस्थापकांशी चर्चा केली असता साई श्रध्दा चॅरेटेबेल संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. त्यावर विश्वस्त म्हणून ठाणे,मुंबई परिसरातील व्यक्ती आहेत. अंजनेरी ग्रामपंचायतीअंतर्गत हा आश्रम येतो. मात्र अंजनेरी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. येथे सतत मोठ मोठे राजकीय पुढा-यांची वर्दळ असल्याने परवानगी बाबत कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नव्हता असे दिसून आले आहे. पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून हद्दीत असलेल्या सर्व अनाथालयांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुला व मुलींचे आधारतीर्थ असा दावा संस्थाचालक त्र्यंबक गायकवाड करतात. त्यामुळे नक्की येथील मुले-मुली आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचीच आहे का? याबाबतही माहिती पोलिस घेत आहेत.
पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे देखील याबाबत आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेगलवाडी नाशिक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांनी या हत्येचा तपास वेगाने करावा तसेच या आश्रमाच्या नावाने काय प्रकार चालतात याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.