गॅस तुटवड्याच्या पाश्वर्र्भूमीवर प्रशासनाची तपासणी मोहीम

शहरातील 170 हॉटेल्स, 48 गॅस एजन्सींची पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
शहरात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. घरगुती गॅसचा गैरवापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये यासाठी विविध ठिकाणी पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 170 हॉटेल्स आणि 48 गॅस एजन्सींची पाहणी करण्यात आली.
प्रशासनाच्या पथकांनी शहरातील विविध भागांमध्ये अचानक भेटी देत गॅस सिलिंडरचा साठा, पुरवठा तसेच व्यावसायिक वापरासाठी घेतलेल्या गॅसचा वापर योग्य प्रकारे होत आहे का, याची तपासणी केली. या मोहिमेत एकूण 218 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
तपासणीदरम्यान गॅस पुरवठ्याची स्थितीही पाहण्यात आली. त्यानुसार एचपीसीएलकडून सुमारे 9400, बीपीसीएलकडून 24 हजार 500, तर आयओसीएलकडून सुमारे 1070 ते 1080 सिलिंडर उपलब्ध झाले आहेत. एकूण 34 हजार 970 सिलिंडरचा साठा प्राप्त झाला असून त्याचे पुढील तीन दिवसांत वितरण करण्यात येणार आहे.
नागरिकांना गॅस उपलब्धतेबाबत अडचणी येऊ नयेत तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होऊ नये यासाठी ही तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. पुढील काळातही अशा तपासण्या सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

17 भरारी पथके तैनात

गॅसचा काळाबाजार व घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 17 भरारी पथके नियुक्त केली आहेत. त्यापैकी 2 पथके जिल्हास्तरावर तर 15 पथके तालुकास्तरावर कार्यरत आहेत. ही पथके गॅस एजन्सींची अचानक तपासणी करून व्यावसायिकांना सिलिंडरचा पुरवठा होत नाही ना तसेच घरगुती सिलिंडरचा गैरवापर होत नाही ना, याची खात्री करत आहेत.

Administration’s inspection campaign against the backdrop of gas shortage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *