अग्रलेख

साहसी अंतराळ प्रवासी

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळ प्रवासी सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या ‘नासा’तून निवृत्त झाल्या आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संघटना) म्हणजे इस्त्रो ही भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे. या संस्थेने अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. चांद्रयान, मंगळाच्या कक्षेत यान पाठविणे अशा अनेक मोहिमा यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे ‘नासा’ ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे. नासाने 1969 मध्ये पहिला मानव यानाने चंद्रावर पाठविला. नासाने अंतराळ स्थानक स्थापन केलेले आहे. नासामध्ये सुनीता विल्यम्स कार्यरत होत्या. त्या निवृत्त झाल्या असल्या, तरी त्यांचे साहस आणि मार्गदर्शन भारतीय तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. दोन वर्षांपूर्वी त्या अंतराळ स्थानकात अडकून पडल्या होत्या. मोठ्या संकटातून त्या सुखरूप बाहेर पडल्या. त्यांच्या कारकिर्दीतील ती मोहीम ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरली. त्या मोहिमेची आठवण आजही जिवंत आहे. सन 2024 मध्ये त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन अडकल्या होत्या. तेव्हा संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर बुच विल्मोर होते. 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्टारलाइनर परत येऊ शकले नाही, त्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या. हे मिशन केवळ आठ दिवसांचे होते. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे त्यांना सुमारे 286 दिवस तिकडेच राहावे लागले. त्यांना परत आणण्यासाठी नासा व अमेरिकन सरकारने विशेष प्रयत्न केले. त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल अंतराळात पाठविण्यात आले होते. हे कॅप्सूल 19 मार्च 2025 रोजी पहाटे फ्लोरिडा किंवा मेक्सिकोच्या आखातात सुरक्षितपणे उतरले तेव्हा सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर पृथ्वीवर परत आले. तेव्हा जगभर आनंद व्यक्त करण्यात आला. सुनीता आणि विल्मोर परत आले तेव्हा याच सदरात 31 मार्च 2025 रोजी ‘सुस्वागम्’ मथळ्याखाली त्यांचे स्वागत केले होते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीवर परत कधी येणार? याची उत्सुकता सार्‍या जगाला लागली होती. विशेषतः भारतीय आणि अमेरिकन नागरिकांना दोघांच्या भवितव्याची चिंता लागली होती. दोघे परत येतील काय? येणार असतील तर कधी? ते दोघे अंतराळातच राहणार काय? त्यांचे भवितव्य काय? असे नानाविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघे अंतराळात गेले होते. पण, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना तब्बल नऊ महिने अडकून पडावे लागले. त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत होते. अखेर प्रयत्नांना यश आले. दोघे परत आल्याने त्यांचा नवा जन्म झाल्याचे आता मानले गेले. भारतीयांनासुद्धा आनंद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत आनंद व्यक्त करत त्यांच्या धाडसाचे कौतुकही केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दोघांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे, ते अध्यक्ष झाल्यानंतर अंतराळात अडकून पडलेल्या अंतराळवीरांना वाचविण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. त्यांचे तत्कालीन सल्लागार एलॉन मस्क यांची त्यांनी मदत घेतली होती.सुनीता विल्यम्स यांनी अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या; पण ती मोहीम सर्वांत कठीण होती. दोघे अडकून पडले. नऊ महिन्यांच्या कालावधीचा योग्य उपयोग करून त्यांनी वेगळ्या प्रकारचे संशोधनही केले. या कालावधीत सुनीताने 17 ते 18 वेळा स्पेसवॉक (अवकाशात चालणे) केला. इतक्या वेळा अंतराळामध्ये स्पेसवॉक करणार्‍या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या. ‘नासा’मध्ये काम करणार्‍या सुनीता विल्यम्स यांची ती कामगिरी देदीप्यमान आणि प्रेरणादायी होती. अमेरिकन हवाईदलात काम करणार्‍या सुनीता विल्यम्स यांनी स्वत:कडील लढावूवृत्ती समोर आणल्यामुळेच त्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रात नासाने संधी दिली होती. अंतराळात अडकून पडलेल्या कालावधीत सुनीता विल्यम्स सर्वांना शुभेच्छा देत होत्या. नववर्षाच्या (2025) शुभेच्छासुद्धा तिने तमाम पृथ्वीवासीयांना दिल्या होत्या. परत आल्यानंतर पृथ्वीवरील सामान्य वातावरणाशी त्यांनी काही दिवसांनंतर जुळवून घेतले. त्यांचे नियमित जीवन सुरू झाले. दि. 20 जानेवारी 2026 रोजी त्यांनी आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. एखादी व्यक्ती काळजीपूर्वक निरीक्षण करत असेल, तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर साधे असू शकते, असे त्या यावेळी म्हणाल्या होत्या. सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या 27 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली. सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती 27 डिसेंबर 2025 पासून असल्याचे ‘नासा’ने जाहीर केले. त्यांची निवड 1998 मध्ये नासाने केली होती. त्यांनी आपल्या तीन मोहिमांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत. नासाच्या अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक काळ अंतराळात राहणार्‍यांच्या यादीत त्या दुसर्‍या क्रमांकावर आहेत. सुनीता विल्यम्स मूळच्या गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासनमधील आहेत. त्यांचे वडील मूळचे गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासनमधील होते. निवृत्तीच्या वेळी भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, अंतराळ हे माझे सर्वांत आवडते ठिकाण आहे. त्यांनी 27 वर्षांच्या प्रवासासाठी सहकार्‍यांचे आणि नासाचे आभार मानले. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी सुनीता विल्यम्स यांचे वर्णन मानवी अंतराळ मोहिमांमधील मार्गदर्शक असे केले असून, त्यांच्या कार्यामुळे येणार्‍या पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल, असे म्हटले आहे. सुनीता विल्यम्स यांनी एकूण 9 वेळा स्पेसवॉक (अंतराळात चालणे) केले असून, त्यासाठी त्यांनी 62 तास आणि सहा मिनिटे वेळ व्यतित केला आहे. कोणत्याही महिला अंतराळवीरासाठी हा एक जागतिक विक्रम आहे. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावर वैज्ञानिक प्रयोगांना प्रगत केले. सुनीता विल्यम्स यांची पहिली मोहीम म्हणजे 9 डिसेंबर 2006 रोजी डिस्कव्हरी या अंतराळ यानातून पहिले उड्डाण केले. दुसरी मोहीम (2012) 127 दिवसांची होती. यादरम्यान त्यांनी अंतराळ स्थानकातील अमोनिया गळती थांबवण्यासाठी आणि सोलर अ‍ॅरेमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी महत्त्वाचे स्पेसवॉक केले होते. तिसरी आणि शेवटची मोहीम जून 2024 मध्ये त्या बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेवर गेल्या होत्या. अवघ्या 10 दिवसांची ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे नऊ-साडेनऊ महिने लांबली. त्या मार्च 2025 मध्ये यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतल्या. सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पंड्या हे मूळचे गुजरातचे आहेत. सुनीता यांचा हिंदू धर्मावर गाढा विश्वास आहे. अंतराळात जाताना सोबत भगवद्गीता आणि गणपतीची मूर्ती घेऊन त्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे, ख्रिश्चन धर्मीय असलेले त्यांचे पती मायकल हे सुनीता यांच्या श्रद्धांचा पूर्ण आदर करतात आणि त्यांच्या प्रत्येक यशात सहभागी होतात. वयाच्या 60 व्या वर्षी सक्रिय सेवेतून निवृत्त होताना त्यांनी अंतराळ संशोधनाची मशाल आता पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago