40 वर्षांनंतर रस्त्याचा तिढा अखेर सुटला

श्रमदानातून नगरसूलच्या महाले वस्तीवर रस्ता तयार

नगरसूल : प्रतिनिधी
येथील महाले वस्तीवरील गेल्या चाळीस वर्षांपासून कोर्ट-कचेर्‍याच्या फेर्‍यात अडकलेला रस्त्याचा व शेतीचा वाद अखेर सामोपचाराने मिटला. त्यामुळे येथील पाच भावंडांची शेती, रहिवाशांच्या रस्त्याचा तिढा कायमचा सुटला आहे. येथील जलसंधारण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी केशवराव महाले यांनी अखेर सर्वांची समजूत काढून कोर्टकचेरीच्या फेरीत अडकलेला रस्ता आणि शेतीचा वाद एकत्र बसून घरीच मिटविला
आहे.
येथील दिवंगत शेतकरी गिरुबा सखाराम महाले यांच्या मालकीची सुमारे 25 एकर 13 गुंठे जमीन ते हयात असताना त्यांच्या पाच मुलांमध्ये 1966 मध्ये वाटणीपत्राद्वारे झाली होती. राज्य शासनाच्या तुकडे बिल कायद्यांंतर्गत बांध टाकण्यात आले. मात्र, कालांतराने शेतीचे बांध व रस्त्याचे वाद निर्माण झाले. वाद कोर्टात गेले. तारीख पे तारीख करत वर्षानुवर्षे लोटले. मात्र, शेती आणि रस्त्याचे वाद मिटले नाही.
मध्यस्थीची भूमिका घेऊन येथील केशवराव महाले यांनी अखेर सर्वांची समजूत काढून कोर्ट-कचेरीच्या फेरीत अडकलेला रस्ता आणि शेतीचा वाद घरीच मिटविला. गिरुबा महाले यांच्या पाच मुलांची जमीन कमीअधिक करून, तसेच सर्व्हे नंबरच्या दोन्ही, उत्तर आणि दक्षिणेकडील बाजूस 5-5 फूट पूर्व-पश्चिम रस्ता ठेवून वाद
मिटवला आहे. तसेच संबंधित रस्ता आणि शेतीचा कोर्टात सुरू असलेला दावा माघारी घेण्याचे सर्वानुमते ठरलेे. रस्त्याचे काम श्रमदानातून केलेे.
यावेळी सीताराम महाले, हरिकृष्ण महाले, केशव महाले, बळीराम महाले, सुदाम महाले, अनिल महाले, सुनील महाले, वामन महाले, डॉ. मनोज महाले, संतोष महाले, रामकृष्ण महाले, मनोज बोढरे, बाळू बोढरे, राजेंद्र महाले आदी उपस्थित होते. रस्ता आणि शेतीचा जुना वाद सामोपचाराने मिटविल्याने केशवराव महाले यांनी इतरही शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील रहिवाशांची गैरसोय कायमस्वरूपी दूर झाली आहे.

आमच्या कुटुंबाचा वाद बर्‍याच दिवसांपासून खितपत पडला होता. कोर्टकचेरी झाल्या, पण हा वाद मिटावा हा हेतू माझा होता. आमच्या चुलत्याची मुले, आम्ही भाऊ एकत्र येऊन या वादातून काहीच साध्य होणार नाही हे सर्वांनी ऐकले. त्यामुळे हा शेतरस्त्याचा वाद मिटला.
– केशव महाले, सेवानिवृत्त अधिकारी, जलसंधारण विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *