अग्रलेख

ड्रग्ज माफियाच्या मृत्यूनंतर

ड्रग्ज माफिया किंवा अमली पदार्थांचा स्मगलर (तस्कर) हा काही मोठा देशभक्त नसतो किंवा समाजसेवकही नसतो. मात्र, त्याची एक दहशत असते. त्याची एक टोळी (गँग) असते. तिचे सदस्य अंडरग्राउंड असतात. ते दहशत माजवतात. लोकांना त्रास देतात. भारतात दाऊद इब्राहिम, छोटा राजन, बडा राजन, अबू सालेम अशी काही नावे कुविख्यात आहेत. त्यात अलीकडे बिश्नोई टोळीची भर पडली आहे. दाऊद इब्राहिम अजूनही भारताच्या ताब्यात नाही. तो पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते. एका गुंडाचा किंवा डॉनचा मृत्यू झाला तर खळबळ माजते. लोक त्याचे समर्थन करत नाहीत. पण, त्याच्या टोळीतील सदस्यांचा सर्वसामान्यांना धोका असतोच. उतर अमेरिका खंडातील मेक्सिको नावाच्या देशातील सर्वांत मोठा ड्रग्ज माफिया किंवा अमली पदार्थांचा स्मगलर एल. मेंचो याचा एका लष्करी कारवाईत मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात हिंसाचार उसळला. मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज माफिया नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हांतेस उर्फ ‘एल. मेंचो’ रविवारी लष्करी कारवाईत ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर देशातील अनेक राज्यांत हिंसाचार उसळला आहे. वाहनांना आगी लावण्यात आल्या, महामार्ग रोखण्यात आले, सुरक्षा दलांशी चकमकी झडल्या, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. मेक्सिकोच्या सीमेवरील अमेरिका, कॅनडा या देशांनी आपल्या नागरिकांसाठी सुरक्षेचे सल्ले दिले. मेक्सिकोपासून दूर असलेल्या आपल्या भारतानेही भारतीय नागरिकांसाठीही तेच सल्ले दिले आहेत. मेक्सिकोच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जालिस्को राज्यातील तापाल्पा येथे लष्कराच्या हायप्रोफाइल ऑपरेशनमध्ये 60 वर्षीय ‘एल. मेंचो’ गंभीर जखमी झाला. नंतर त्याचा मृत्यू झाला. तो ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल’चा म्हणजे मेक्सिकोतील सर्वांत शक्तिशाली ड्रग्ज माफिया आणि खतरनाक टोळीचा प्रमुख होता. अमेरिकेने मेंचोच्या अटकेसाठी 15 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प प्रशासनाने न्यू जनरेशन कार्टेलला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते. एल. मेंचो ठार झाल्याचे समजताच काही तासांतच बंदूकधार्‍यांनी जालिस्कोमध्ये वाहनांची जाळपोळ केली, रस्ते अडवले. पाच राज्यांत हिंसाचार पसरल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि कॅनडातील विमान कंपन्यांनी मेक्सिकोसाठी अनेक उड्डाणे रद्द केली. मेक्सिको, अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि जगासाठी ही चांगली बातमी असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेत ड्रग्जची, विशेषतः फेंटानिलची तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर दबाव वाढवलेला असताना, ‘एल. मेंचो’ आणि त्याच्या साम्राज्यावर ही कारवाई झाली आहे. मेक्सिकोने तस्करी रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, असा आरोप करत निर्यातीवर कर लावण्याची धमकी ट्रम्प वारंवार देत होते. पण, 2022 मध्ये अमेरिकन न्याय विभागाने मेंचोच्या विरोधात फेंटानिल निर्मिती आणि वितरणाचे आरोप दाखल केले होते. फेंटानिल हे नशा आणणारे अनैसर्गिक रशियन असून, नैसर्गिक अफूच्या तुलनेत ते कैक पटींनी घातक आहे. एल. मेंचोचा अंत मेक्सिकोतील संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे त्याची ताकद आणि प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. एल. मेंचोचा जन्म मेक्सिकोच्या एका अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात 1966 मध्ये झाला. जिथे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. घरची परिस्थिती इतकी खराब होती की, त्याला पाचवीतच शाळा सोडावी लागली आणि तो आपल्या वडिलांसोबत अ‍ॅव्हाकॅडोच्या बागांमध्ये मजुरी करू लागला. पण, या मजुरीतून काहीच सुधारेना, म्हणून त्याने वयाच्या चौदाव्या वर्षी गांजाच्या शेतांची राखण करायला सुरुवात केली. तिथूनच त्याचा गुन्हेगारी जगाशी संबंध आला. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत गेला, तिथे त्याने ड्रग्ज विकले म्हणून त्याला अमेरिकेत तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यावर त्याला पुन्हा मेक्सिकोला पाठवण्यात आले. मेक्सिकोत आल्यावर त्याने एक विचित्र पाऊल उचलले, तो चक्क पोलीस दलात भरती झाला. पण पोलीस म्हणून काम करताना त्याचे मन तिथे रमले नाही. उलट पोलिसांत राहूनच त्याचे संबंध मोठे ड्रग्ज माफिया आणि ‘मिलेनिओ कार्टेल’शी आले. त्याने पोलीस दलाचा राजीनामा दिला आणि तो पूर्णपणे ड्रग्जच्या धंद्यात शिरला. तिथे त्याने रोसालिंडा गोन्झालेझ नावाच्या मुलीशी लग्न केले, जिचे कुटुंब ड्रग्जच्या व्यापारात खूप श्रीमंत आणि ताकदवान होते. या लग्नामुळे मेंचोला पैसा आणि गुन्हेगारी जगतातली मोठी माणसं सहज मिळाली. सुरुवातीच्या काळात मेंचो हा एल. चापोच्या ‘सिनालोआ येथील अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कार्टेल’साठी काम करायचा. चापो तेव्हा मेक्सिकोचा सर्वांत मोठा डॉन होता आणि मेंचो त्याच्या शत्रूंना संपवणारा एक क्रूर हस्तक होता. पण, मेंचो खूप महत्त्वाकांक्षी होता. 2010 च्या सुमारास जेव्हा त्याच्या मूळ टोळीचा प्रमुख पकडला गेला, तेव्हा मेंचोने एल. चापोची साथ सोडली आणि स्वतःची ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ नावाची स्वतंत्र टोळी उभी केली. केवळ नैसर्गिक ड्रग्ज विकून फायदा नाही, असा विचार मेंचोने केला. त्याने चीनमधून केमिकल्स मागवून ‘फेंटानील’ नावाचे अत्यंत घातक आणि स्वस्त ड्रग्ज बनवायला सुरुवात केली. यामुळे त्याच्याकडे अमाप पैसा आला. त्याचा एल. चापो या ड्रग्ज किंगशी संबंध आला. एल. चापोचे पूर्ण नाव जोक्विन गुझमान होते. तो मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील एक अत्यंत शक्तिशाली ड्रग्ज माफिया होता. ‘सिनालोआ कार्टेल’ची (अमली पदार्थ व्यवसाय) स्थापना त्यानेच केली होती. 70 आणि 80 च्या दशकात त्याने शून्यातून आपले प्रचंड साम्राज्य उभे केले होते. एल. मेंचो आणि एल. चापो यांचा संबंध साधारण 2003 ते 2005 च्या दरम्यान आला. त्यावेळी मेंचो अमेरिकेतून हद्दपार होऊन मेक्सिकोत परतला होता. तो ‘मिलेनिओ कार्टेल’ नावाच्या टोळीत सामील झाला. ही मिलेनिओ टोळी एल. चापोच्या सिनालोआ कार्टेलच्या अधिपत्याखाली काम करायची, ज्यामुळे मेंचो हा सुरुवातीला एल. चापोचे एक रक्षक म्हणून काम पाहू लागला. त्या काळात एल. चापोच्या साम्राज्याला ‘झेटास’ नावाच्या एका अत्यंत क्रूर टोळीने आव्हान दिले होते. तेव्हा मेंचो यांने चापोच्या रक्षणासाठी आणि शत्रूंना संपवण्यासाठी ‘मेटा झेटास’ नावाची एक विशेष तुकडी तयार केली होती. मेंचो हा सुरुवातीला चापोचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जात होता. मात्र, 2010 मध्ये मिलेनिओ कार्टेलच्या प्रमुखाला अटक झाल्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले. मेंचो याने चापोची साथ सोडली. त्याने स्वतःची ‘जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ ही स्वतंत्र टोळी स्थापन केली. जेव्हा 2017 मध्ये एल. चापो कायमचा अमेरिकेच्या तुरुंगात गेला. तेव्हा मेंचो याने चापोच्या टोळीतील सदस्यांशी युद्ध पुकारले आणि त्याच्या साम्राज्यावर ताबा मिळवला. जेव्हा एल. चापो कायमचा अमेरिकेच्या तुरुंगात गेला, तेव्हा मेंचोने संधी साधून चापोच्या मुलांशी आणि त्याच्या टोळीशी युद्ध पुकारले. त्याने इतकी दहशत माजवली की, त्याने मेक्सिकन लष्कराचे हेलिकॉप्टर चक्क रॉकेट लॉन्चरने पाडले होते. मेंचोचा अंत झाला असला, तरी त्याच्या समर्थकांनी संपूर्ण मेक्सिकोला वेठीस धरले आहे. कोणीतरी मेंचोची जागा घेण्यास भविष्यात पुढे येण्याची शक्यता आहे. एल. मेंचोला पकडण्यासाठी लष्कराने घातलेल्या छाप्याच्यावेळी आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये सुरक्षा दलांचे किमान 27 सदस्य, 46 संशयित गुन्हेगार आणि एक नागरिक ठार झाला, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

After the death of the drug mafia

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago