समर्थ सेवामार्ग जागतिक कृषी
महोत्सव उदघाटन
नाशिक.. “अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि समर्थ गुरुपीठ यांनी आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे कृषी आणि ऋषी असा अनोखा संगम असून यनिमित्ताने आपण सेंद्रिय, अध्यात्मिक, नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प करून कीटकनाशकाना हद्दपार करूया “असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
डोंगरे वसतिगृहावर होणाऱ्या पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचा शानदार उदघाटन सोहळा आज संपन्न झाला. या प्रसंगी ना विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प पू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे,चंद्रकांतदादा मोरे,आमदार अर्जुन खोतकर, आ सीमा हिरे, आ चंद्रकांत पाटील,नितीनभाऊ मोरे,माजी आमदार अनिल कदम,शैलेश कुटे, शितल माळोदे, स्वाती भामरे, सुवर्णा मटाले, कावेरी घुगे, पंढरीनाथ थोरे,वत्सलाताई खैरे,दिनकर पाटील, कृषी विभाग अधिकारी मोहन वाघ, विष्णू गर्जे, सारिका सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या आधी सकाळी रामकुंड परिसरातून निघालेल्या कृषी दिंडीने, यातील आदिवासी नृत्य, सेवामार्गाच्या विविध विभागाचे फलक हाती घेतलेले बालक, हाती भगवे ध्वज घेतलेले स्त्री पुरुष, विविध वेशातील बालक यांनी संपूर्ण मिरवणूक मार्गांवर मंगलमय, उत्साही वातावरण तयार केले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही भव्य कृषी दिंडी कार्यक्रम स्थळी पोचताच मुख्य सोहळा प्रारंभ झाला.
आपल्या विस्तृत मनोगतात बोलताना ना राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले ” मी कृषी मंत्री असताना हा कृषी महोत्सव सुरु झाला याचे मला खूप समाधान आहे. येथे एकच छताखाली सर्व संशोधन, ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकरी शेतीत मूलभूत क्रांती घडवून आणत आहेत. नाशिक जिल्ह्यातून 30 हजार कोटींची शेतीमाल निर्यात होते हा या क्रांतीचा एक नमुना आहे. आज शेतकरी एकत्र येऊन प्रगती साधत आहेत.”
शेतकऱ्यांचा जनावरांचा गोठा हा अत्यंत दुर्लक्षित असून तो नीटनेटका ठेऊन आता काही शेतकरी गोठ्यात स्तोत्र मंत्र लावत आहेत आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गुरुमाऊली यांनी सेवामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या हितगुजातून दिली