अग्रलेख

सर्वजन एआय, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय…

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात, कृत्रिम प्रज्ञेचा डंका जगभर आहे. एआय तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहे. मानवच त्याचा वापर करत असला, तरी त्याच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहेच. तरीही एआयला बायपास करून पुढे जाता येणार नाही. भारताने नवी दिल्लीत ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद भरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी रोजी परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी विविध स्टॉल्सना भेट देत तरुण उद्योजकांशी संवाद साधला. ‘एआय’मुळे नोकर्‍या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, यात घाबरून न जाता शांत राहा, नोकरी वाचविण्यासाठी एआयची नवी साधने शिका आणि स्वतःला सतत अपडेट ठेवा, असा स्पष्ट संदेश तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी कर्मचार्‍यांना या परिषदेत दिला. ‘एआय’ मानवतेच्या सेवेसाठी, नोकर्‍या हिरावण्यासाठी नाही, हेच पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भारताची संस्कृती आहे आणि याच भावनेतून भारत एआयकडे पाहत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेतील एका सत्रात स्पष्ट केले. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेच्या घोषणापत्रात सर्वांसाठी ‘एआय’वर भर देण्यात आला आहे. सामाजिक हितासाठी एआयचा वापर करण्याबाबतची व्यापक जागतिक सहमतीचे घोषणापत्र निदर्शक आहे ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भारतीय तत्त्वप्रणाली घोषणापत्रात अधोरेखित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहु-भागधारकांच्या सहभागाला बळकटी देणे, राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर करणे, सुलभ आणि विश्वासार्ह चौकटींद्वारे एआयला पुढे नेणे यांवर घोषणापत्रात भर देण्यात आला आहे. सात स्तंभांवर (चक्र) आधारित हे घोषणापत्र आहे. 1) एआय संसाधनांचे लोकशाहीकरण, 2) आर्थिक वाढ 3) सामाजिक कल्याण, सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय, 4) विज्ञानासाठी एआय, 5) सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रवेश, मानवी भांडवल विकास, 6) लवचिक, कार्यक्षम आणि नावीन्यपूर्ण एआय प्रणाली, 7)जागतिक कामगिरीची घोषणा यांवर घोषणापत्र आधारित आहे. आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यात एआयची भूमिका, मुक्त स्रोत आणि सुलभ एआय परिसंस्थांचे महत्त्व, ऊर्जा-कार्यक्षम एआय पायाभूत सुविधांची आवश्यकता, विज्ञान, प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणात एआयची भूमिका वाढवणे, जागतिक सहकार्य मजबूत करणे यांवरही भर देण्यात आला आहे. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय (सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी) या प्रेरणादायी तत्त्वाला अनुसरून आमचा असा विश्वास आहे की, एआयचे फायदे जेव्हा मानवतेसाठी होतील तेव्हाच त्याचा खरा उपयोग होईल, असे घोषणापत्रात म्हटले आहे. घोषणापत्रात मानवतेचा विचार करण्यात आला असला, तरी एआयचा वापर जरा जपूनच करावा लागणार आहे. एआयवर पूर्ण विश्वास ठेवून चालणार नाही, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. एआय तंत्रज्ञानाबाबत संभ्रम आणि संशय कायम आहे. परिषद भरली असताना, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात किंवा अन्य कोणत्याही न्यायालयात दाखल करण्यात येणार्‍या याचिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चिंताजनक असल्याचे स्पष्ट मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यक्त केले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये बनावट आदेशांचा संदर्भ आणि चुकीची उदाहरणे दिली जात असल्याचे
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. अशा प्रकारच्या चुकीच्या संदर्भांमुळे आणि चुकीच्या माहितीमुळे न्यायदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आणि भीतीही सरन्यायाधीशांनी व्यक्त केली होती. अस्तित्वातच नसलेल्या एखाद्या खटल्याचा उल्लेख करून एआयच्या माध्यमातून याचिका दाखल केल्या जात असल्याची माहितीही सरन्यायाधीशांंनी दिली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता एक तंत्रज्ञान आहे. वापर केल्यानंतरच त्याचे चांगले-वाईट परिणाम दिसतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता अस्तित्वात नसलेल्या गोष्टीच समोर आणल्या जात असल्याने गैरसमजाचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरण्याची भीती लक्षात घ्यायला हवी. औद्योगिक किंवा आर्थिक विकास यासाठी या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर जरी स्वीकारार्य असला, तरी हे तंत्रज्ञान जर चुकीच्या हातात पडले तर त्यातून अनेक नकारात्मक गोष्टी बाहेर येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे आशय समोर येत आहेत त्यांच्यामध्ये मुक्तपणे आणि चुकीच्या पद्धतीने एआयचा वापर होताना दिसत आहे.एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे, याबाबत संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती या तंत्रज्ञानाने निर्माण केलेली असल्याचे दिसते. परिषद भरण्यापूर्वी केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी कठोर नियम जारी केले. एआय वापरून तयार केलेले फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओबाबत सरकारने कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. एआयचा वापर करून निर्माण करण्यात आलेल्या सर्व आशयांवर स्पष्टपणे ‘एआय’ असे लेबल लावणे आवश्यक करण्यात आले. याचा उद्देश
डीपफेक, बनावट व्हिडीओ आणि दिशाभूल करणारी माहिती रोखणे, हा आहे जेणेकरून वापरकर्ते खर्‍या आणि बनावटीत फरक करू शकतील. नवीन नियमांनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले कोणतेही फोटो, व्हिडीओ किंवा ऑडिओ स्पष्ट लेबलसह प्रदर्शित करावे लागतील. सोशल मीडिया कंपन्यांना खात्री करावी लागेल की, वापरकर्ते अचूक माहिती देत आहेत. जर कोणताही दिशाभूल करणारा किंवा बेकायदेशीर एआय कंटेंट आढळला तर तो तीन तासांच्या आत काढून टाकणे बंधनकारक असेल. या नियमांमुळे इन्स्टाग्राम, फेसबुक व यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीत लक्षणीय बदल होतील. एआय वापरून रील, फेस-स्वॅप व्हिडीओ किंवा बनावट आवाज तयार करून लोकप्रियता मिळवणार्‍यांना आता सावधगिरी बाळगावी लागेल. सर्व एआय कंटेंटवर एक लेबल दिसेल, जे प्रेक्षकांना सतर्क करेल की तो खरा नाही. जर कोणी जाणूनबुजून एआयचा वापर लपवला तर त्यांचे खाते निलंबित किंवा कायमचे बंद केले जाऊ शकते. नवीन नियमांनुसार एआयद्वारे परवानगीशिवाय एखाद्याचा चेहरा किंवा आवाज वापरणे कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते. आज विनोद किंवा ट्रेंड वाटणारी गोष्ट भविष्यात गंभीर समस्या ठरू शकते. त्यामुळे आशयनिर्मिती तयार करताना निर्मात्यांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. आशयांविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी सरकारचे नियम चांगले आहेत. एआय किंवा कृत्रिम प्रज्ञा परिषदेत एका विद्यापीठाने रोबोट तयार केल्याचा दावा फोल ठरला. ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाच्या वतीने सादर करण्यात आलेला चार पायांचा रोबोटिक डॉग हा विद्यापीठानेच विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तो प्रत्यक्षात चीनमध्ये तयार होणारे व्यावसायिक उत्पादन असल्याचे समोर आल्यानंतर टीकेचा भडिमार झाला. भारताच्या विद्यापीठाने चिनी रोबोट स्वतःचा म्हणून सादर केल्याचे म्हणत चीनमधील नेटकर्‍यांनी चांगलीच खिल्ली उडवली. त्यानंतर आयोजकांनी गलगोटिया विद्यापीठाला आपला प्रदर्शन स्टॉल तातडीने रिकामा करण्यास सांगितले. एआयचा वापर करून काहीही करता येऊ शकते किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार झालेले दुसर्‍याचे उत्पादन आपल्या नावावर खपवता येऊ शकते. हेच या प्रकरणावरून सिद्ध झाले. कृत्रिम प्रज्ञा कितीही चांगली असली, तरी तिचे परिणाम चांगले असतात, असे नाही. तंत्रज्ञानाचे जसे फायदे-तोटे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे फायदे-तोटेही लक्षात घेतले पाहिजे. हेच आम्ही 20 फेब्रुवारीच्या अंकात याच सदरात ‘कृत्रिम प्रज्ञा’ या मथळ्याखाली म्हटले होते. उपजत किंवा नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांतील फरक लक्षात घ्यायला पाहिजे.

AI for all, welfare for all, happiness for all…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

5 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

5 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

5 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

5 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

5 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

6 hours ago