मालमता कराबाबतही दिलासा
उद्योगमंत्री उदय सामंत यांची महत्वपूर्ण घोषणा
नाशिक-आयमाच्या उद्योजकांची दुहेरी फायरसेसमधून सुटका करून त्यांच्याकडून एकच टॅक्स घेतला जाईल.तसेच जाचक मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा देण्यात येणार असून पूर्वीच्या औधोगिक कॅटेगरीच्या दराप्रमाणेच हा कर आकारावा अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली तेव्हा उद्योजकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले.आयमाच्या सततच्या पाठपुराव्याचेच हे यश असल्याचे बोलले जाते.
100 एकरवर आयटी पार्क व 100 एकरवर कृषी प्रक्रिया केंद्र हे चालू करणार.तसेच नाशकात डेटा सेंटर उभारणार असेही आपल्या भाषणात ना.सामंत पुढे म्हणाले.
नाशिक,सिन्नर तसेच जिल्ह्यातील उद्योजकांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यास आयमाच्या अंबड येथील सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना सामंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना.दादा भुसे, खा.हेमंत गोडसे, आ.सीमाताई हिरे,आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब,सल्लागार समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे,माजी अध्यक्ष धनंजय बेळे,महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, राजेंद्र अहिरे आदी होते.
आयमाच्या उद्योजकांना दुहेरी फायरसेस द्यावा लागतो ही बाब निश्चितच अन्यायकारक असल्याचे मान्य करून एकच टॅक्सबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत दुहेरीसेसची वसुली स्थगित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याने उद्योजकांत आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसले. ट्रक टर्मिनसचा प्रश्न लवकर सोडविणार,सीईपीटीबाबत लवकरच निर्णय घेऊ,एसटीपी अमृत-2 मधून घेऊ.उद्योजकांबरोबर महिन्यातून एक बैठक घेण्यास आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सांगण्यात येईल.नाशकात 100 एकर जागेत आयटी पार्क करता येईल का याचा विचार सुरू आहे.नाशिकला ऍग्रो-इंडस्स्ट्री पार्क सुरू करता येईल का याचा विचारही सुरू आहे असे सांगतानाच येत्या बुधवारी नाशिकच्या औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी येत्या बुधवारी मुंबईत पालकमंत्री दादा भुसे यांच्या दालनात बैठक घेण्याची घोषणा ना.सामंत यांनी केल्याने नाशिकच्या औद्योगिक बळकटीसाठी यात बूस्टर डोस मिळण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.पूर्वीचे मंत्री मंत्रालयात बैठका घ्यायचे.मात्र आम्ही जागेवर बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावतो. नाशकात उद्योग येण्याचे पोटंशियल आहे असेही त्यांनी निदर्शनास आणले.
आयमाने जिल्ह्याचे नेतृत्व करावे,अशी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.उद्योगधंदेवाढीसाठी नाशिकसह राज्यात चांगले वातावरण आहे.मात्र विरोधक नाहक याबाबत राज्याची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.आयमाच्या पुढाकाराने नाशकात 6000 कोटींची गुंतवणूक येणार हे शुभ संकेत असल्याचेही ते म्हणाले.अंबड औधोगिक वसाहत परिसरात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार असे संकेतही त्यांनी दिले.नाशिक येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात 1000हून अधिक लोकांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचेही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील बंद असलेले उद्योग परत सुरू कसे करता येतील याबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा तसेच आयटीसाठी प्रोत्साहनामक योजना लागू करता येतील काय याचा विचार व्हावा आदी सूचना खा.हेमंत गोडसे यांनी केल्या.औधोगिक क्षेत्रासाठी वीजदर कमी करावे,ट्रक टर्मिनस व्हावे आदी सूचना आ.सीमा हिरे यांनी केल्या.आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ आणि माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अंबड,सातपूरसह जिल्ह्यातील उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न मांडले. अंबडचे विभाजन करून एमआयडीसी परिसरात स्वतंत्र पोलीस स्टेशन करा,दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्यात तरी नाशिकचा समावेश करवा,नाशकात मोठयप्रमाणात गुंतवणुकीसाठी प्रोत्सहानात्मक योजना जाहीर करा,दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करा,मालमत्ता कराची आकारणी पूर्वीच्या दराने करा आदी मागण्या त्यांनी केल्या.सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न नामकर्ण आवारे यांनी मांडले.
विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी रमेश वैश्य, सुधाकर देशमुख,संदीप गोयल,राजेंद्र फड यांनीही यावेळी मौलिक सूचना केल्या.यावेळी आयमाच्या डिरेक्टरीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी ज्येष्ठ उद्योजक विक्रम सारडा अरविंद पवार विविध यंत्रणांचे अधिकारी नितीन गवळी संदीप पाटील बाळासाहेब झाज्जे,आर.सी.दोर्वे,अभिषेक निकम,अर्जून गुंडे,आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे सुदर्शन डोंगरे सहसचिव योगिता आहेर गोविंद झा कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे,वरूण तलवार यांच्यासह आयमाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिंदाल लि. ने 250 कोटी, रिलायन्स लाइफ सायन्स 4200 कोटी,सॅमसोनाईट लिमिटेड, डीडी के एपकॉस500 कोटी, रोठे एरडे 350 कोटी,इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 400कोटी तर जोस्टिक एडेसिव्हजने नाशकात 150 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे धनंजय बेळे यांनी सांगितले तेव्हा टाळ्यांचा पाऊस पडला होता.याबद्दल या कंपन्यांचे वरिष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर राव,ज्ञानेश्वर पाटील, एच.एस.बॅनर्जी, मनीष अग्रवाल,जी.पी.एस.सिंग जयंत जोगळेकर यांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला